spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आजारी असतानाही कामाची सक्ती केल्याने कामगाराचा मृत्यू; ५० लाख रुपये मदतीची ‘सिटू’ची मागणी

– दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा; कॉम्रेड राजेंद्र साठे यांचा इशारा

हंसराज,भंडारा :- सियाराम सिल्क लिमिटेड या नामांकित कापड उद्योगात काम करणाऱ्या एका कंत्राटी कामगाराचा कामावर असतानाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकृती खालावलेली असतानाही व्यवस्थापनाने बळजबरीने कामाला लावल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत, मृत कामगाराच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सिटूचे (CITU) राज्य पदाधिकारी कॉम्रेड राजेंद्र साठे यांनी केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील रहिवासी असलेले हेमराज वासुदेव हुकरे हे सियाराम सिल्क लिमिटेडमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते.

घटनेच्या दिवशी त्यांची प्रकृती ठीक नव्हती, तरीही कंपनीच्या सुपरवायझर आणि मॅनेजरने त्यांना कामावर येण्यासाठी आणि काम करण्यासाठी बळजबरी केली.

कामाचा ताण आणि आजारपणामुळे काम करत असतानाच हेमराज अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच सिटूचे राज्य पदाधिकारी कॉ. राजेंद्र साठे, नागपूर जिल्हा कमिटी सदस्य कॉ. प्रमोद कावळे, कामगार प्रतिनिधी आकाश बावणे आणि आशिष जामुनकर यांनी मृत हेमराज यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना कॉ. प्रमोद कावळे यांनी सांगितले की, हेमराज यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक भान राखत त्यांचे मुख्य अवयव दान केले आहेत.

सिटूच्या मुख्य मागण्या: श्रद्धांजली सभेदरम्यान कॉ. राजेंद्र साठे यांनी प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. मृत कामगाराच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची सानुग्रह मदत तातडीने देण्यात यावी, त्यांच्या विधवा आईला दरमहा पेन्शन स्वरूपात सहयोग राशी प्रदान करण्यात यावी. आजारी असतानाही कामाची सक्ती करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.

या घटनेमुळे कामगार वर्गात संतापाची लाट असून, प्रशासनाकडून यावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 “आज उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची अवस्था शेतमजुरांपेक्षाही दयनीय झाली आहे. व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण कामगाराला आपला जीव गमवावा लागला. भविष्यात सियाराम मिल किंवा इतर कोणत्याही उद्योगात अशा प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा कॉ. राजेंद्र साठे यांनी यावेळी दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.