हंसराज भंडारा :- भंडारा नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. कामांची अनिवार्य असलेली ‘त्रयस्थ संस्था तपासणी’ (थर्ड पार्टी इन्स्पेक्शन) न करताच कंत्राटदारांची कोट्यवधींची बिले काढण्यात आली असून, या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनानुसार, भंडारा नगर परिषद मागील काही वर्षांपासून भ्रष्टाचाराचे केंद्र बनली आहे. शासनाच्या नियमानुसार ५ लक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र, भंडारा नगर परिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी या नियमाला हरताळ फासला आहे.
५० कोटींची कामे संशयाच्या भोऱ्यात प्रशासकीय काळात दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिक निधीतून बगिचा सुशोभीकरण, वाचनालये, शौचालय बांधकाम, सिमेंट रोड आणि नाली बांधकामासारखी कामे करण्यात आली. यापैकी एकाही कामाची त्रयस्थ तपासणी करण्यात आली नाही. अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकली आणि नियमबाह्यरीतीने बिले अदा केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. दर्जाहीन कामांमुळे दलित वस्तीतील नागरिकांवर अन्याय झाल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
जलपर्यटन कामाची चौकशी प्रलंबित दोन वर्षांपूर्वी जलपर्यटन प्रकल्पाच्या नावाखाली दलित वस्ती नसलेल्या जागेवर २८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. ती जागा नगर परिषदेच्या पूर्णपणे अखत्यारीत नसतानाही झालेला हा खर्च संशयास्पद असून त्याची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. तसेच, निविदा प्रक्रियेत स्पर्धा होऊ न देता राजकीय दबावातून मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली, ज्यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले आहे.
मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी या भ्रष्ट कारभारातून अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमविली असून त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख तिलक सार्वे, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, हर्षल टेंभुरकर, नदीम शेख, अनिरुद्ध गाढवे, राजेश ठवकर, प्रकाश गभणे यांसह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.