सावनेर :- तालुक्यातील हेटी चौकी शिवारात रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान हरणाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गेल्या दोन दिवसांत अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याने परिसरात वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना कळवले. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.
दरम्यान, हितेश बनसोड यांनी आपल्या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून हरणाचा मृतदेह हलविण्यास मदत केली. तसेच वन विभागाचे अधिकारी विजय गंगावणे यांनाही घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली.
सलग दोन दिवसांत हरणाच्या अपघाती मृत्यूच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात येत असून, संबंधित विभागाने या भागात वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.