spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दिवसा उकाडा; रात्री विजेचा लपंडाव, पायाभूत सुविधेत महावितरण फेल

– कमी दाबाच्या विज पुरवठ्याने उपकरणांची हानी

– ग्राहक संरक्षण कायद्याची पायमल्ली

– तक्रार क्रमांकावर प्रतिसाद मिळेना

यवतमाळ :- यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाचा पारा चांगलाच भडकला आहे. चक्क ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. त्यातच शहरात कुठलाही हरितपट्टा नाही. विकासाच्या नावाखाली गर्द हिरवी निंबाची झाडे निर्दयीपणे तोडली गेली. त्यामुळे दिवसा गर्मीचा उकाडा अन्‌ रात्री चालणाऱ्या विजेच्या लपंडावाने नागरिक वैतागले आहे. काल मंगळवारी रात्री चक्क १.३० वाजेपर्यंत वडगाव भागातील जांब रोडवरील तुकडोजीनगरातील नागरिकांना रात्रच जागून काढावी लागली. एकंदरीत पायाभूत सुविधेत जिल्ह्याची महावितरण यंत्रणा पुर्णत: फेल ठरली आहे.

महावितरणच्या विरोधात एकही वृत्त प्रकाशित होऊ नये याची काळजी अमरावती येथील महावितरणचे जनसंपर्क अधिकारी घेतात. इतकेच काय महावितरणमधील अनियमिततेवर कुणी थोडेसे जरी विरोधात लिहिले तर चक्क न्यायालयीन नोटीसांचे इशारे दिले जाते. मात्र, महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह उर्जामंत्री व राज्यमंत्र्यांना ग्राहकांच्या हक्काचे भान आहे की नाही असा सवाल उपस्थित होतो आहे. मुळात शहरात विजेचा वारंवार लपंडाव होतो. विज पुरवठा सुरळीत असलातरी कमी दाबाचा असतो. त्यामुळे पंखे, कूलर व एसी अजिबात चालत नाही. अनेकदा वारंवार विज पुरवठ्यात बिघाड होत असल्याने अनेकांच्या घरातील टिव्ही, फ्रिज, एसी यासारखी महागडी उपकरणे जळून खाक झाली आहे. मात्र, त्या नुकसानीला जबाबदार कोण हा प्रश्‍न विचारायला पर्याय नाही. काल मंगळवारी रात्री जांब रोड परिसरातील सर्व भागातील विज पुरवठा बंद झाला होता. रात्री १.३० वाजेपर्यंत हा पुरवठा बंद असल्याने अनेकांना तोवर जागरण करावे लागले. विशेष म्हणजे महावितरणच्या उपअभियंत्यांसह कार्यकारी अभियंत्यांना रात्रीला संपर्क करता येत नाही. ग्राहकांसाठी काही दिलेले मोबाईल क्रमांक केवळ टूक-टूक आवाज करतात. त्यामुळे ग्राहकांची चांगली फजीती होते. अनेकदा पाऊस, वादळ, वारा आल्यास विज पुरवठा खंडीत होणे समजू शकते. मात्र कुठलेही कारण नसतांना विज पुरवठा खंडीत होत असल्यास महावितरणच्या विद्युत विषयक पायाभूत सुविधांचा अभावच त्याला कारणीभूत ठरतो हे स्पष्ट होत आहे.

प्रत्येक रोहित्रावर अनावश्‍यक लोड

अनेक नगरात बसविलेले रोहित्र जणू अखेरच्या घटका मोजत आहे. या रोहित्रांना कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाही. कुणीबी येतो अन्‌ रोहित्रात आपले अभियांत्रीकी ज्ञान पाजळत असल्याची अवस्था आहे. अनेक रोहित्रावरुन केवळ महावितरण कर्मचाऱ्यांच्या निकटवर्तीय किंवा स्नेहबंध असलेल्या नागरिकांच्या घरी सुरळीत पुरवठा व्हावा म्हणून काही कर्मचारी सुविधा पुरवितात. महावितरणच्या एका अधिकाऱ्याने तर आपल्या घरासमोर एक विशेष लाईटची सोय केली आहे. स्वत:च्या इमारतीवर हा उजेड पाडला जातो आहे. त्यामुळे ग्राहकांप्रती हा विभाग किती सौजन्यशिल हा प्रश्‍न आहे. अनेक भागातील रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक लोड येतो आहे. त्यामुळे नवीन रोहित्र तातडीने बसवावे, अशी मागणी आहे.

हायमास्ट दिवा केला जातो बंद

तुकडोजीनगरात तत्कालीन खा. भावना गवळी यांच्या पुढाकारातून चौकात हायमास्ट लाईट बसविण्यात आला. मात्र काल मंगळवारी रात्री या भागातील विजेच्या कमी दाबाचे कारण पुढे करुन कुणीतरी हा लाईटच रात्रीला बंद केला. मुळात या भागात नाला असल्याने सरपटणारे जीव अधिक असतात. रात्रीला हा लाईट कुणी बंद केला या दिशेनेही महावितरणच्या उपअभियंत्यांनी चौकशी केली पाहिजे, अन्यथा यासंदर्भात संबंधित लाईट बंद करणाऱ्यांविरुध्द पोलीसांत लेखी तक्रार दिली जाईल तसेच हा विषय पालकमंत्र्यांसह थेट उर्जामंत्र्यांच्याही काणी टाकला जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असा इशाराच दै. लोकसूत्रचे कार्यकारी संपादक व या भागातील निवाशी केशव सवळकर यांनी दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.