छत्रपती संभाजीनगर :- कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तब्बल १३१ गोवंशाची पोलिसांनी सुटका केली. शहरातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बकरी ईदच्या पूर्वसंध्येला बुधवारी (दि.२७) दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान बायजीपुरा-संजयनगर भागात करण्यात आली. विशेष म्हणजे हे गोवंश दाटवस्तीत आणि काही घरांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर, छतावर लपविण्यात आले होते. पोलिसांनी ८ आरोपींना ताब्यात घेतले असून, चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, आरोपींची साखळी निष्पन्न करून टोळीवर मोक्का लावणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.
‘पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी शासनाने गोवंश हत्या आणि बेकायदेशीर मांस विक्रीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकानुसार, पोलिसांनी कत्तलखान्यांशी संबंधित व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांच्या बैठका घेतल्या होत्या. तसेच शांतता समितीच्या बैठकीत स्थानिक धर्मगुरूंनीही गोवंश हत्या न करण्याचे आवाहन केले होते.
एवढेच नाही तर फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सनाही याबाबत कल्पना देण्यात आली होती. मात्र तरीही जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही घरांमध्ये कत्तलीसाठी गोवंश लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस आयुक्तालयातून मोठा फौजफाटा दुपारी २ वाजेच्या सुमारास जिन्सी भागात दाखल झाला. त्यांच्या मदतीला राखीव दलाच्या तुकड्या देण्यात आल्या होत्या. संजयनगर, बायजीपुरा भागात कोम्बिंग सुरू केले. १० ते १२ घरांमध्येच पोलिसांना मोठ्याप्रमाणात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गायी आढळून आल्या. काही घरांच्या तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर गायी लपविण्यात आल्याचे पाहून पोलिसही अवाक झाले होते. सर्व गायींना जिन्सी पोलिस ठाण्यातून मनपाच्या कोंडवाडा वाहनातून गोशाळेत पाठविण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.



