spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ताडोबाच्या बफर झोनमध्ये वन्यजीवांचा बळी! रेल्वेच्या भीषण धडकेत वाघाचा जागीच अंत

चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वन्यजीवांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोंदिया–नागभीड–बल्लारशा रेल्वेमार्गावरील सिंदेवाही–राजोली रेल्वे स्थानकादरम्यान एका वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली असून भरधाव मालगाडीची जोरदार धडक बसल्याने वाघ जागीच मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही घटना सिंदेवाही–राजोली रेल्वे मार्गावरील क्रमांक 1181/8 परिसरात घडली. सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू करण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, वाघ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना भरधाव मालगाडी त्याच्यावर आदळली. धडक इतकी भीषण होती की वाघाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

सध्या मृत वाघाचे वय, लिंग आणि तो कोणत्या वनक्षेत्रातील आहे याबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच संबंधित वाघाचा हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील कॅमेरा ट्रॅप आणि वन विभागाच्या नोंदी तपासल्या जात आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.