– आरोपींची संख्या 13 वर, यापैकी 9 जण महाराष्ट्रातले
नाशिक :- NEET-UG 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 13 झाली असून यापैकी 9 जण महाराष्ट्रातले आहेत. लातूरमधील डॉ. मनोज शिरुरे आणि पुण्यातील कोचिंग इन्स्टिट्यूटचे शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, असे सीबीआयने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात डॉ. मनोज शिरुरे या लातूर येथील डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. एका कोचिंग सेंटरच्या मालकाचा मुलगा (जो स्वतः आरोपी आहे) याच्यासह एकूण तीन विद्यार्थ्यांना, आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवून देण्यात या डॉक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली होती असे सीबीआयने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी म्हणजे तेजस हर्षदकुमार शाह. हा पुण्यातील ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल ॲकॅडमी’ या कोचिंग सेंटरमध्ये भौतिकशास्त्राचा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याला NEET-UG 2026 परीक्षेचे फुटलेले भौतिकशास्त्राचे प्रश्न, यापूर्वीच अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून मिळाले होते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी आणि त्यामागील कट उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू आहे. CBI ने आतापर्यंत विविध ठिकाणी 49 ठिकाणी झडत्या घेतल्या असून, अनेक गुन्हेगारी पुरावे ठरू शकणारी कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या वस्तूंचे सखोल विश्लेषण करण्याचे काम सध्या सुरू आहे.



