हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील पहेला-चोवा-आंभोरा या मार्गाच्या रखडलेल्या आणि निकृष्ट कामामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुकारलेल्या ‘रस्ता रोको’ आंदोलनास्थळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, वेळेत काम पूर्ण करा आणि निकृष्ट काम करणाऱ्या त्या कंत्राटदाराची बिले थांबवून त्याची चौकशी करा,” अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. कंत्राटदाराची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांनाही याप्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
या आंदोलनादरम्यान खासदार डॉ. पडोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मस्के, श्रावणकर, सोनकुसरे, नायब तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाशी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रशासनाकडून विविध मागण्या मान्य करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने पुढील दोन दिवसांत उर्वरित स्लॅब आणि ड्रेनेजचे काम सुरू करणे, ५ जून २०२६ पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला गती देणे आणि पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच, शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यांचे काँक्रीटीकरण मुख्य कामासोबतच करणे, नादुरुस्त पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करणे आणि शेतीसाठी आवश्यक असलेले क्रॉस ड्रेनेज काँक्रीट पाईप बसविण्याचेही प्रशासनाने मान्य केले.
जनतेच्या न्याय मागण्यांना यश आल्याने आणि प्रशासनाने सकारात्मक लेखी आश्वासन दिल्याने अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे पहेला-आंभोरा रस्त्याच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार असून हा जनतेच्या एकजुटीचा विजय असल्याचे मानले जात आहे. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य सुभाष आजबले, जि.प. सदस्य अनिता भुरे, पं.स. सदस्य सीमा रामटेके, बाळू ठवकर, जगदीश उईके, राजू मेश्राम, राजू हलमारे, वामन शहारे, स्वप्नील आरीकर यांसह परिसरातील शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



