◼️धान खरेदीअभावी शेतकरी संकटात
◼️आदिवासी शेतकऱ्यांत संताप
◼️९९० शेतकऱ्यांकडून खरेदी नाही
सचिन चौरसिया, रामटेक:- शासनाच्या हमीभाव योजनेवर विश्वास ठेवून धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांचे धान खरेदीविना पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पवनी खरेदी केंद्रातच तब्बल १५०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी केवळ ५१२ शेतकऱ्यांचेच २० हजार ५६० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. उर्वरित ९९० शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार क्विंटल धान खरेदीविना राहिले आहे. हमीभाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी शासनाच्या खरेदी प्रक्रियेत सहभागी झाले होते.मात्र ३१ मार्च रोजी खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली.त्यानंतर १ एप्रिलपासून काटेही बंद करण्यात आले.विशेष म्हणजे शासनाकडून कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नाही.परिणामी अनेक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकण्याची वेळ आली. देवलापार परिसर हा आदिवासी बहुल क्षेत्र असून येथील बहुतांश शेतकरी आदिवासी समाजातील आहेत. त्यामुळे आदिवासी विकास विभागाकडूनच आदिवासी शेतकऱ्यांवर दुजाभाव होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.फक्त पवनीच नव्हे तर तालुक्यातील आदिवासी महामंडळाचे डोंगरी येथील खरेदी केंद्र तसेच फेडरेशनचे हमलापुरी, घोटी, महादुला व पंचाळा येथील केंद्रांचीही हीच अवस्था असल्याचे समोर आले आहे.प्रत्येक केंद्रात सरासरी २० हजार क्विंटल धान खरेदीविना राहिल्याचे सांगितले जात आहे.एकंदरीत तालुकाभरात ८० ते ९० हजार क्विंटल धान खरेदीअभावी पडून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर रब्बीची खरेदी करावी अशी मागणी आकाश वासनीक, स्वप्नील सर्याम, विक्की सिंद्राम, बंसीलाल भलावी, श्रीराम चापले, आनंद वाडिवे, आदित्य ईनवाते, संतलाल उईके, विशाल रोहनकर, रविंद्र वरकडे, आकाश जैस्वाल, राजेश ईनवाते यांनी केली आहे.
धान विक्रीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करूनही खरेदी न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी अखेर बेभावाने व्यापाऱ्यांना धान विकले. तर काहिंचे धान अद्यापही घरीच पडून असल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संपूर्ण परिस्थितीस जबाबदार कोण,असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.
धान खरेदी केद्र बदलले
१) पवनी येथील धान खरेदी केंद्रावरील गोडावुन पॅक झाल्याने. उन्हाळी धान खरेदी करण्याकरीता हिवराबाजार येथे जागा घेण्यात आली असून आता तेथे खरेदी केंद्र तयार करण्यात आले आहे.
२) एकीकडे खरीप हंगामातील धान पुर्णत: खरेदी करता न येणाऱ्या महामंडळाने रब्बी धानाची खरेदी सुरु केल्याचा देखावा करीत आहे.
शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील धान खरेदी न केल्याने शेतकऱ्यात संतापाचे वातावरण आहे.
३) एकीकडे खरीपातील धान करेदी थांबविली व रब्बी धान खरेदी सुरु केली असली तरी खरीपकडे ही लक्ष देण्याची गरज आहे.



