चंद्रपूर :- पोटच्या दोन मुलांची प्रत्येकी 2 लाख रुपयांना विक्री केल्यानंतर 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा डाव रचणाऱ्या एका निर्दयी मातेला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे चंद्रपूर आणि तेलंगणापर्यंत पसरलेल्या एका मोठ्या आंतरराज्य बाल तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आईसह बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधार आणि नराधम प्रियकर फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पतीच्या निधनानंतर आरोपी महिला मुख्य सूत्रधार अजय फुलझेले नावाच्या इसमासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. या काळात नराधम प्रियकर अजय याने महिलेच्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या अत्याचारातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. या संपूर्ण घृणास्पद प्रकाराची कुठेही वाच्यता होऊ नये आणि गुन्हा लपवता यावा, यासाठी मुलीची सख्खी आई आणि तिच्या प्रियकराने एक कट रचला. त्यांनी मुलीला प्रसूतीसाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांना संशय येऊ नये म्हणून मुलीचे वय 15 ऐवजी 20 वर्षे असल्याचे खोटे सांगितले.
प्रसूती दरम्यान डॉक्टरांना मुलीच्या वयाबाबत संशय आला. त्यांनी तातडीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तपासाची चक्राकार चक्रे फिरवली आणि मुलीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी सुरू केली.
पोलिसी खाक्या दाखवताच निर्दयी मातेने गुन्ह्याची कबुली दिली. परंतु, या चौकशीत जो खुलासा झाला त्याने पोलिसांचेही धाबे दणाणले. या महिलेने यापूर्वीच आपल्या दोन निष्पाप मुलांची प्रत्येकी 2 लाख रुपयांना विक्री केली होती. अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या नवजात बाळालाही विकण्याचा तिचा आणि प्रियकराचा डाव होता. रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत नवजात बालकांची खरेदी करणाऱ्या चंद्रपूर आणि तेलंगणातील दोन महिलांना अटक केली आहे. आरोपींवर मानवी तस्करी आणि ‘पॉक्सो’ अंतर्गत अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नराधम प्रियकर अजय फुलझेले हा सध्या फरार असून पोलीस त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. या आंतरराज्य रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.



