spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सीआयडी कार्यालयाला कुलूप लावा, सीबीआयकडे तपास द्या! – रोहित पवार

मुंबई :- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला चार महिने उलटले आहेत. मात्र, प्रदीर्घ कालावधी उलटूनही संवेदनशील प्रकरणात सीआयडीकडून ठोस माहिती किंवा प्रगती अहवाल आतापर्यंत आला नाही. तपास यंत्रणांकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आमदार रोहित पवार यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत हातात कुलूप घेऊन सीआयडी कार्यालय गाठले. ‘तपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा,’ अशी मागणी त्यांनी केली.

आमदार रोहित पवार म्हणाले, ‘राज्याच्या महत्त्वाच्या नेत्याच्या अपघाती मृत्यूला चार महिने पूर्ण होऊनही अद्यापि सत्य बाहेर का आले नाही? या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे? तपास कुठपर्यंत पोहोचला? याची सविस्तर माहिती जनतेला मिळणे हा त्यांचा हक्क आहे,’ अशी मागणी त्यांनी केली.

सीबीआयकडे तपास द्या!

‘अजितदादांच्या निधनानंतर तपास काय झाला, याच्या माहितीसाठी आम्ही चार महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत. आम्ही आज सीआयडी कार्यालयात अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता, ते अधिकारी आमच्यावर ओरडले. जो विभाग काम करत नाही, तो बंद करा, असे मोदी म्हणाले आहेत. त्यानुसार हा विभाग काम करत नाही, त्यामुळे तो तातडीने बंद करावा. हा तपास सीबीआयकडे द्या. व्ही. के. सिंग याच्यावर कारवाई करा. मी सीआयडीकडे माझ्या नावाने आरटीआय करणार,’ असेही रोहित पवार यांनी सांगितले.

तपास योग्य दिशेने, वेगाने सुरू आहे – सीआयडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेप्रकरणी योग्य दिशेने तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दिली आहे. एएआयबी, डीजीसीए, एफएसएल या संस्थांशी संपर्क साधून तपासात लागणाऱ्या अहवालांचा पाठपुरावा करत असल्याचे स्पष्टीकरण सीआयडीने दिले आहे.

‘त्यांच्या’ पक्षाचा रिमोट कंट्रोल भाजपकडे!

‘पार्थ पवार हे भाजपच्या मार्गदर्शनात काम करत आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत पक्ष राहणार नाही. त्यांच्या पक्षातील दोन ते तीन नेत्यांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे ते पक्ष आणखी अडचणीत आणत आहेत. पक्षाचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे,’ असेही रोहित पवार म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.