– महावितरणाला निवेदन सादर
पांढरकवडा केळापूर तालुक्यातील शेतशिवारातील वीजपुरवठा गत अनेक महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. गत एक मे पासून रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजही पुरवली जात नसल्याने स्थानिक शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. वारंवार होणाऱ्या या वीज खडित समस्येमुळे संतप्त झालेल्या पहापळ येथील शेतकऱ्यांनी अखेर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. पहापळ शिवारात गत अनेक महिन्यांपासून वीज वारंवार खंडित होण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दिवसा प्रत्येक दोन तासांत किमान चार ते पाच वेळ अचानक वीज ट्रिप होते. त्यामुळे शेतातील कामे करणे अशक्य झाले आहे. त्यातच १ में पासून प्रशासनाने रात्रीच्या वेळी मिळणारी सिंगल फेज वीजही बंद केल्याने संपूर्ण पहापळ शेत शिवार रात्रीच्या वेळी अंधारात बुडून जात आहे. सध्या शेतशिवारात रात्रीच्या वेळी जंगली हुक्कर, रोही आदी वन्यप्राण्यांचा आणि विषारी सापांचा उपद्रव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अशा कठीण आणि अंधाऱ्या परिस्थितीत शेतकर्यांनी शेतात कसे राहायचे आणि पिकांची राखण कशी करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पहापळ शिवारातील शेतकरी बांधवांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच उपकार्यकारी अभियंता पांढरकवडा यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी सागर मुप्पीडवार, गणेश नांदेकर, भाऊराव खांडरे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.



