– कोट्यवधींच्या व्यापारावर परिणाम
नागपूर :- भारतीय आंब्यांच्या निर्यातीला मोठा धक्का बसला असून, जपानने तब्बल २० वर्षांनंतर भारतीय आंब्यांच्या आयातीवर पुन्हा बंदी घातली आहे. जपानी अधिकाऱ्यांनी भारतातील आंबा प्रक्रिया केंद्रांमध्ये कीड नियंत्रण आणि निर्जंतुकीकरण प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्याचा दावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बंदीमुळे हापूस, केसर, लंगडा, बंगनपल्ली, चौसा आणि मलिका या लोकप्रिय भारतीय आंबा जातींच्या निर्यातीवर थेट परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते जून हा भारतीय आंबा निर्यातीचा सर्वाधिक महत्त्वाचा हंगाम मानला जातो. त्यामुळे निर्यातदार आणि शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जपानचे क्वारंटाईन अधिकारी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातील रेहमनपूर येथील व्हेपर हिट ट्रीटमेंट (VHT) केंद्रांच्या तपासणीसाठी भारतात आले होते. या प्रक्रियेद्वारे आंब्यांवरील फळमाशी (Fruit Fly) आणि इतर कीटक नष्ट केले जातात. मात्र तपासणीदरम्यान फ्युमिगेशन आणि निर्जंतुकीकरण प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचे जपानी अधिकाऱ्यांनी नमूद केले. यानंतर योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने २५ मार्च २०२६ नंतर जारी करण्यात आलेल्या भारतीय प्रमाणपत्रांसह पाठविलेले आंबे स्वीकारले जाणार नसल्याची अधिसूचना जारी केली. सुधारित मानके लागू होईपर्यंत ही बंदी कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, १९८६ मध्येही जपानने भारतीय आंब्यांवर फळमाशीच्या भीतीमुळे बंदी घातली होती. तब्बल २० वर्षांनंतर २००६ मध्ये भारताने आवश्यक तांत्रिक आणि वैज्ञानिक अटी पूर्ण केल्यानंतर ही बंदी हटविण्यात आली होती. आता पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय निर्यातदारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश असून दरवर्षी सुमारे २८ दशलक्ष मेट्रिक टन आंब्यांचे उत्पादन घेतले जाते. जपान हा भारताचा सर्वात मोठा बाजार नसला तरी तेथील बाजारपेठेत भारतीय आंब्यांना प्रीमियम दर मिळतो. त्यामुळे या बंदीचा आर्थिक परिणाम मोठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, भारतीय आंबा उत्पादक संघटना आणि केंद्र सरकार जपानी अधिकाऱ्यांशी चर्चा करत असून, लवकरात लवकर बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.



