– शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार
मुंबई :- केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून, राज्यात मॉन्सूनचे आगमन ८ ते १० जूनदरम्यान होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागप्रमुख एस. डी. सानप यांनी दिली. सानप म्हणाले, मॉन्सून सध्या अरबी समुद्रातून श्रीलंका मार्गे अंदमान-निकोबारपर्यंत पोहोचला आहे. मात्र केरळमध्ये दाखल होण्यासाठी आवश्यक वातावरणीय परिस्थिती अद्याप पूर्णपणे अनुकूल झालेली नाही. पुढील चार दिवसांत परिस्थिती पोषक झाल्यास मॉन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.
दरम्यान, विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात उष्णतेची लाट तसेच काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २८ मेनंतर विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचेही सानप यांनी सांगितले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा या भागांत सध्या उष्णतेच्या लाटेची परिस्थिती नसून तापमानात काही प्रमाणात घट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केरळमध्ये मॉन्सून आगमनाच्या तारखेत चार दिवस पुढे-मागे होणे ही सामान्य बाब असून, अनुकूल परिस्थिती निर्माण होताच मॉन्सून आगमनाबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असेही सानप यांनी नमूद केले.



