spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गुमथळा येथे ‘कुष्ठरोग निराधार कॅम्प’, ४३ लाभार्थ्यांना मिळाला शासकीय योजनांचा आधार

कामठी :- समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या कुष्ठरुग्णांना आणि निराधार घटकांना मानाचे स्थान व शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यातील गुमथळा ग्राम पंचायत येथे एका विशेष ‘कुष्ठरोग निराधार कॅम्प’चे आयोजन करण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा प्रांजल वाघ यांच्या विशेष पुढाकारातून आणि संकल्पनेतून हा कौतुकास्पद उपक्रम स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. या कॅम्पच्या माध्यमातून तब्बल ४३ लाभार्थ्यांना आशेचा आणि मदतीचा भक्कम आधार देण्यात आला.

वेदना आणि संवेदनशीलतेचा संगम

या कॅम्पदरम्यान अत्यंत भावूक आणि संवेदनशील वातावरण पाहायला मिळाले. लहान निरागस मुलांपासून ते तरुण, विवाहित आणि ज्येष्ठ कुष्ठरुग्णांच्या डोळ्यांतील वेदना उपस्थितांनी जवळून अनुभवल्या. केवळ वैद्यकीय उपचार किंवा प्रशासकीय मदतच नव्हे, तर समाजाकडून मिळणाऱ्या मायेच्या दोन शब्दांची या रुग्णांना किती तीव्र गरज आहे, हे तिथे प्रकर्षाने जाणवले. समाजाने दुर्लक्षित केलेल्या या घटकांना प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी स्वतः जवळ करत माणुसकीची ऊब देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्या हक्काचा माणूस पाठीशी उभा असल्याचे पाहून अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू उमटले, तर काहींच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आनंदाश्रू आले.

प्रशासनाची खंबीर साथ

निराधार आणि गरजू लोकांकरिता चालवण्यात आलेल्या या विशेष उपक्रमाला प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण सहकार्य केले. या प्रसंगी तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार सारिका धात्रक आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा प्रांजल वाघ यांनी उपस्थित राहून रुग्णांशी थेट संवाद साधला आणि त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या महत्त्वपूर्ण सेवाकार्याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा प्रांजल वाघ, सरपंच प्रणाली डाफ, सुभाष धुळसे तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश डाफ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटेसर, तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ मनोहर येडे, प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा चे आरोग्य सहाय्यक अशोक निमजे, आरोग्य कर्मचारी नारायण धावड, रोशन देशभ्रतार, शंकर भिसे, तृप्ती तुप्पट, दुर्गा गभने, सातपुते, वृंदा दाऊस्कर, सिमा नागलाव, वर्षा बोरकर, मंगला अनेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या या उपस्थितीमुळे रुग्णांना ‘आपण समाजात एकटे नाही’ हा मोठा धीर मिळाला. मानवी हक्कांची जपणूक करणारा आणि निराधारांना सन्मानाने जगण्याची उमेद देणारा हा कॅम्प कामठी परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Popular Articles