– खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली पाहणी; प्रशासकीय ढिसाळपणावर व्यक्त केला तीव्र संताप
हंसराज, भंडारा :- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील साकोली तालुक्यातील कुंभली येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर प्रशासनाचा कमालीचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. गेल्या ९ दिवसांपासून शेतकरी आपल्या वाहनांसह कडाक्याच्या उन्हात रस्त्यावर ताटकळत उभे असून, खरेदी केंद्राबाहेर तब्बल २ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
याठिकाणी शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. मोजमाप प्रक्रियेत कमालीची संथ गती असून, ओळखीच्या लोकांचा मका आधी मोजला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यातच आता ‘अवकाळी पावसाचे’ सावट असल्याने, उघड्यावर असलेला लाखो रुपयांचा मका भिजून मातीमोल होईल, या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत नवनिर्वाचित खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र संताप व्यक्त केला. डॉ. पडोळे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा विपणन अधिकारी (DMO) यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती मांडली. “प्रशासनाने तातडीने बंद असलेली शासकीय गोदामे खुली करावीत आणि मका खरेदीचा वेग वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आता या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे होणार की शेतकऱ्यांची ही होरपळ अशीच सुरू राहणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



