हंसराज भंडारा :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘विचार विभाग’ प्रदेश सरचिटणीस पदी भंडारा येथील गणेश घनश्याम लिमजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसोबतच त्यांच्याकडे नागपूर आणि संपूर्ण विदर्भ विभागाच्या प्रभारी पदाची मोठी जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद यांनी ही घोषणा केली. गणेश लिमजे हे भंडारा शहरातील डॉ. आंबेडकर वॉर्ड, व्ही.टी.सी. येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, गणेश लिमजे यांनी तात्काळ आपला पदभार स्वीकारून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करावे. नागपूर आणि विदर्भ विभागात काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव गणेश लिमजे यांच्या या निवडीमुळे भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रदेश सरचिटणीस आणि विदर्भ प्रभारी या दोन्ही जबाबदाऱ्या मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. आपल्या निवडीबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.



