हंसराज भंडारा :- गंभीर आजार मुळापासून बरे करण्याचे खोटे दावे करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन मोठ्या औषध विक्री केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. भंडारा शहरातील ‘श्री लक्ष्मी आयुर्वेद औषधालय’ आणि ‘पतंजली चिकीत्सालय’ (मे. अविशा इंटरप्राइजेस) या दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असून, एकूण २९ हजार ७९२ रुपये किमतीचा आक्षेपार्ह औषध साठा जप्त करण्यात आला आहे.
औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा, १९५४ अंतर्गत काही गंभीर आजारांवर (उदा. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, लैंगिक समस्या) औषधामुळे त्वरित गुण येईल किंवा ते आजार पूर्ण बरे होतील, अशी जाहिरात करणे कायदेशीर गुन्हा आहे. भंडाऱ्यातील या दोन पेढ्यांमध्ये तपासणी केली असता, एकूण १५ प्रकारच्या औषधांवर अशाच प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर आढळला. कोणताही वैज्ञानिक आधार नसताना हे दावे केले जात होते.
जप्त करण्यात आलेली औषधे:
🔹 श्री लक्ष्मी आयुर्वेद औषधालय (बडा बाजार): शक्तीपुंज टॅब्लेट्स, श्वेत प्रदरान्तक कॅप्सूल, काम कशारिया कॅप्सूल, फर्मीकॉट सिरप आणि सुंदरी सुधा.
पतंजली चिकीत्सालय (राजीव गांधी चौक): पतंजली कारले-जामुन ज्यूस, हृदयमृत वटी, कांचनार घनवटी, दृष्टी आय ड्रॉप, आय ग्रिट आय ड्रॉप, त्रिफळा चूर्ण, पुनर्नवाद्यारिष्ट, महामंजिष्ठादि क्वाथ, शुद्ध कौंच बीज चूर्ण आणि त्रयोदशांग गुग्गुळ.
कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि नागपूर विभागाचे सहआयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त (औषधे) शहनाज ताजी आणि औषध निरीक्षक मोनिका धवड यांच्या पथकाने ही धाड टाकली.
“जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. आक्षेपार्ह जाहिराती व निकृष्ट दर्जाची औषधे विकणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोरातील कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा सहाय्यक आयुक्त शहनाज ताजी यांनी दिला आहे.
नागरिकांना आवाहन प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन करू नका. जर एखाद्या औषधाच्या दर्जाबाबत किंवा जाहिरातीबाबत शंका असल्यास तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. तक्रार करताना आपले नाव, पत्ता आणि संबंधित दुकानाचा पत्ता स्पष्ट नमूद करावा, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.



