५ जून, ‘जागतिक पर्यावरण दिन’ हा केवळ एक उत्सव नसून आपल्या वसुंधरेच्या, मानवाच्या अस्तित्वासाठी दिलेली हाक आहे. जागतिक पर्यावरण दिनाची घोषणा संयुक्त राष्ट्रांनी १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत केली. होती. ५ जून १९७३ रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा झाला. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी जागतिक स्तरावर जनजागृती करणे आणि मानवी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सामूहिक कृतीला प्रोत्साहन देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. २०२६ च्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना “निसर्गातून प्रेरणा: हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी” अशी आहे. यावर्षीच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू ‘क्लायमेट ऍक्शन’ हा आहे. पर्यावरण ऱ्हासाची प्रमुख कारणे अशी आहेत. कारखान्यांमधून निघणारा धूर आणि विषारी वायूंमुळे होणारे प्रदूषण. उद्योग, शहरीकरण आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल. विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकमुळे जमिनीचा आणि समुद्राचा होणारा नाश. नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडणारा प्रचंड ताण वगैरे. जागतिक स्तरावर हा दिवस १५० हून अधिक देशांना एकत्र आणणारा सर्वात मोठे व्यासपीठ आहे. वाढत्या जागतिक तापमानाने मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे जगासाठी ही ‘आणीबाणीची’ वेळ आहे. भारतासाठी हा दिन अत्यंत कळीचा आहे कारण आपला देश हवामान बदलाच्या परिणामांना, (उदा. अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट) अधिक सामोरे जात आहे. जगातील अतिवृष्टी आणि उष्ण शहरांची संख्या भारतात वेगाने वाढत आहे. भारताने ‘मिशन लाईफ’ अर्थात, लाईफस्टाईल फॉर एनविरोनमेन्ट द्वारे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर योग्य कृतीची गरज आहे. भारतीय संस्कृतीत निसर्गाला पूजनीय मानले जाते, परंतु मुळात आपल्या कृतीतून निसर्गाचे रक्षण कमी आणि भक्षण जास्त होतांना दिसते हे मान्य करावेच लागेल. त्यामुळे या दिनाचे महत्त्व लोकांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी मोठे आहे. विकसित आणि वेगाने विकसित होणाऱ्या देशांच्या अतिवापरवादी वृत्तीमुळे पर्यावरणाला सर्वाधिक धोका आहे. चीन आणि अमेरिका हे जगातील सर्वात मोठे कार्बन उत्सर्जक देश आहेत. कोळशाचा अतिवापर, जीवाश्म इंधनावर आधारित वाहतूक आणि ई-कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन यांमुळे पर्यावरणाचे चक्र बिघडले आहे. मोठ्या राष्ट्रांमधील शस्त्र स्पर्धा आणि क्षेपणास्त्र चाचण्यांमुळेही वातावरणाचा ओझोन थर कमकुवत होत आहे, ज्यामुळे थेट सूर्याची किरणे पृथ्वीला हानी पोहोचवत आहेत. जर आपण आताच सावध झालो नाही, तर नजीकच्या भविष्यात अनेक संकटे ओढवू शकतात. जसे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे जगातील मोठ्या शहरांत पाण्यासाठी युद्धे होऊ शकतात. हिमनद्या वितळल्यामुळे मुंबई, न्यूयॉर्कसारखी किनारपट्टीची शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. जमिनीचा कस कमी झाल्यामुळे आणि सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे कृषी उत्पादन घटून भूकमारी वाढेल, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. वाढत्या उष्णतेमुळे आणि जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे प्राण्यांपासून मानवाकडे येणारे विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढेल. राहण्यायोग्य जागा उरली नाही, तर कोट्यवधी लोकांना स्थलांतर करावे लागेल, ज्यामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. शासनाने प्रदूषणाबाबत कडक कायदे करणे, पुनर्वापरक्षम ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि वनीकरण मोहिमा राबवणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, सामान्य माणसाचे योगदान त्याहूनही मोठे आहे. प्रत्येकाने “रीड्यूस, रियुस, रिसायकल” हे सूत्र पाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, पाणी वाचवणे आणि दरवर्षी किमान एक-दोन झाडे लावून ते जगवणे हे आपले कर्तव्य आहे. पर्यावरण रक्षण ही केवळ वार्षिक औपचारिकता न राहता आपली दररोजची जीवनशैली बनली पाहिजे. कारण निसर्ग टिकला, तरच मानव टिकेल.
आपण आपल्या घरातून किंवा परिसरातून पर्यावरण संवर्धनाची सुरुवात कशी करू शकतो? हा विचार आजच्या दिवशी तरी व्हावा.
– प्रा. विलास डोईफोडे, सावनेर








