हंसराज, भंडारा :- “आमच्या हक्काचे मानधन मिळालेच पाहिजे”, “स्वच्छतागृहे साफ करण्याची सक्ती बंद करा” अशा गगनभेदी घोषणा देत आज भंडारा जिल्हा परिषद परिसर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने दणाणून गेला. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या (आयटक) वतीने आयोजित या ‘महाधरणे’ आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाल्याचे आज पाहायला मिळाले. आंदोलनाचे नेतृत्व करताना जिल्हाध्यक्ष कॉ. शिवकुमार गणविर यांनी प्रशासकीय धोरणांवर कडाडून टीका केली. शासनाने जाहीर केलेली मानधन वाढ जुलै २०२४ पासून थकली असून, ती एरिअर्ससह त्वरित देण्याची मागणी त्यांनी केली. “आम्ही मुलांना मायेने जेवण भरवतो, पण प्रशासन आम्हाला स्वच्छतागृहे साफ करायला लावून आमचा अपमान करत आहे,” अशा भावना यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ‘आयटक’चे जिल्हा संघटक कॉ. राजू बडोले, जिल्हाध्यक्ष कॉ. शिवकुमार गणवीर , कार्याध्यक्ष महानंदा नखाते, जिल्हा सचिव भाग्यश्री उरकुडे , जिल्हा सचिव आयटक कॉ. हिवराज उके , जिल्हाध्यक्ष आयटक कॉ. माधवराव बांते , वृंदा मोहतुरे, इंदू खंडारे, विद्या बोंदरे, भारती अलोने, आशा दुर्गकर, किरण इस्कापे, आणि इतर पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, जर प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही आणि कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबवला नाही, तर शाळांचे कामकाज रोखून धरणारं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
भर उन्हातही शेकडो महिलांची उपस्थिती प्रशासनाचे डोळे उघडणारी ठरली आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय ठोस पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
. प्रमुख मागणी
🔹 किमान २१,००० रुपये वेतन आणि शाळा परिचराचा दर्जा देण्याची मागणी लावून धरण्यात आली.
🔹 शासन निर्णय ४ तासांचा असताना, मुख्याध्यापक ५ वाजेपर्यंत थांबवून घेत असल्याचा आरोप करण्यात आला.
🔹 स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन कर्मचाऱ्यांना काढण्याची भीती दाखवणे बंद करण्याची तंबी संघटनेने दिली.







