spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“प्रत्येक ९ तारखेला गर्भवती मातांची विशेष आरोग्य तपासणी

– सुरक्षित मातृत्वासाठी मनपाचे आवाहन”

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य सभापती मनीषा अतकरे यांनी मंगळवार ९ जून रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हिवरी नगर येथे भेट देऊन पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गर्भवती माता व नवजात बालकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला शासकीय आरोग्य संस्थांमध्ये गर्भवती महिलांची विशेष आरोग्य तपासणी केली जाते.

गर्भधारणेच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील महिलांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत विविध आरोग्य तपासण्या व आवश्यक मार्गदर्शन केले जाते. यामध्ये रक्त तपासणी, लघवी तपासणी, रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच आवश्यकतेनुसार अल्ट्रासोनोग्राफी तपासणीचा समावेश असतो. गर्भधारणेदरम्यान उद्भवू शकणाऱ्या आरोग्यविषयक जोखमींची वेळेत ओळख करून योग्य उपचार व समुपदेशन उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. नियमित तपासणीमुळे माता व बालमृत्यू दर कमी करण्यास तसेच सुरक्षित मातृत्वाला चालना देण्यास मदत होते.

यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य सभापती मनीषा अतकरे यांनी शहरातील सर्व गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आपल्या जवळच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. तसेच, “प्रत्येक ९ तारखेला सर्वप्रथम विचार गर्भवती मातेचा” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवून सुरक्षित मातृत्वासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.

यावेळी मनपाच्या माता व बाळ संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत आतापर्यंत आयुष्मान आरोग्य मंदिर (AAM) व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (UPHC) एकूण १,७०० गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व (ANC) तपासणी करण्यात आली असून, १८८ उच्च-जोखीम (High Risk) गर्भधारणा प्रकरणे निदर्शनास आली आहेत. तसेच २६१ गर्भवती महिलांना सोनोग्राफी (USG) सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Popular Articles