spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संजय राऊत यांना दूर केले नाही तर उबाठाचे जहाज आणखी खोलात जाईल

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई :- उबाठा गटाच्या जहाजाला संजय राऊत यांनी सगळ्यात मोठे भगदाड पाडले आहे. कारण त्यांनी उबाठा गट संपवण्याची सुपारी काँग्रेसकडून घेतली आहे. संजय राऊत आदित्य ठाकरे यांना प्रिय म्हणून शुभेच्छा देत असले तरी त्यांच्या मनात आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अप्रियताच असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. संजय राऊत यांना दूर केले जात नाही तोपर्यंत उबाठा गटाचे जहाज आणखी खोलात जाईल, असा प्रहार भाजपा प्रदेशचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोक आठवड्याचे पाच दिवस काम करून शनिवार – रविवार सुट्टी घेतात. उद्धव ठाकरे यांचे उलट आहे. ते आठवड्याचे पाच दिवस सुट्टी घेऊन घरात बसतात आणि फक्त रविवारी पक्षाची बैठक घेतात. कधीतरी पाच – सहा महिन्यातून एकदा रविवारी बैठक घेऊन ना खासदार तुमच्यासोबत राहणार, ना आमदार, ना कार्यकर्ते. वीकेंडला बैठक घेऊन पक्ष चालवता येत नाही हे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. मातोश्रीचे दरवाजे सर्वसामान्य शिवसैनिकांना, आमदारांना, खासदारांना, पदाधिकाऱ्यांना बंद आहेत. आता संजय राऊतांसाठीही तुम्ही दरवाजे बंद करा, असा सल्ला बन यांनी दिला.

राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातला पक्ष म्हणजे उबाठा गट. ज्या पद्धतीने उबाठा गटाने वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि आपला पक्ष सोनिया गांधी यांच्या दावणीला नेऊन बांधला. त्यामुळे उबाठा गट ही सोनिया गांधींची बेनामी शाखा आहे आणि राहुल गांधींची उपशाखा आहे, हे संजय राऊत आणि लक्षात ठेवावे. ज्या काँग्रेसने स्वा.सावरकरांचा अपमान केला, ज्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला अशा काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधून तुमचा पक्ष संपवून घेतला. आता जर का उद्धव ठाकरेंना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी मूळ शिवसेनेचा विचार स्वीकारला पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेनेकडे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांकडे जावे, असे आवाहन बन यांनी केले.

भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते स्वातंत्र्यलढ्यात होते का नाही होते हे संजय राऊत काय बघायला होते का? स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेला त्यांचा जन्मही झाला नव्हता. हिंदुत्वाची लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, विश्व हिंदू परिषद यांनी लढली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाची लढाई लढत होते तेव्हा संजय राऊत त्यांच्यावर टीका करत होते, संजय राऊतांनी त्यांच्याविरोधात लेख लिहिले आहेत. तुम्ही औरंगजेबाचाच विचार लोकांना शिकवा. कारण तुम्ही मान्य केले की तुम्ही अब्दुल आहात. त्यामुळे तुम्ही औरंगजेबाचा, अफजलखानाचा उदो उदो करा. तुम्ही प्रभू रामचंद्रांचा अपमान केलात. प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यामुळे संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात बन यांनी फटकारले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.