किशोर साहू, मौदा :- महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना मार्गी लावण्यासाठी आणि संघटनेची ताकद दाखवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे 20 जूनला आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशनाला नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मौदा तालुक्यातील खंडाळा (गांगणेर) येथील ग्रामपंचायत कर्मचारी व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन (एनजीपी ४५११ ) चे नागपूर जिल्हा सचिव सतीश वाघमारे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन (एनजीपी ४५११) नागपूर जिल्हा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक 12 जून रोजी नागपूर येथील संघटना कार्यालयात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा अध्यक्ष दत्ता भोयर होते. या बैठकीत आगामी महाअधिवेशनाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेला संबोधित करताना जिल्हा सचिव सतीश वाघमारे यांनी सांगितले की, हे महाअधिवेशन कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. शनिवार, २० जून २०२६, दुपारी ०२:०० वाजता अदिती लॉन्स, लाडगाव, छत्रपती संभाजीनगर आयोजित करण्यात आले असुन या महाअधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच संघटनेचे राज्य अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू, संस्थापक राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर आणि राज्य कार्याध्यक्ष काझी अल्लादिन व राज्य सचिव अशोक कुथे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या विविध न्याय्य मागण्यांवर आणि प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली जाईल. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे आणि संघटनेचे बळकटीकरण करणे हाच या महाअधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सतीश वाघमारे यांनी सांगितले.
या नियोजन बैठकीला नागपूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप धांडे , सुरेश मुन जिल्हा सहसचिव मंगेश भोतमांगे, कार्याध्यक्ष अनिल आंबोने, कोषाध्यक्ष प्रवीण वाहने यांच्यासह संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच महाअधिवेशनात नागपूर जिल्ह्याचा मोठा सहभाग नोंदवण्याचा असा निर्धार केला.







