spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे जाळे; पूर्व विदर्भातील हजारो हेक्टर शेतीला मिळणार शाश्वत पाणी

– वैनगंगा खोऱ्यात जलसमृद्धीकडे मोठे पाऊल

गडचिरोली :- पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नदीवर पूर्ण झालेले, बांधकामाधीन आणि प्रस्तावित बॅरेजेसचे (बंधारे) जाळे उभारण्यात येत आहे. या संकल्पनेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि पुढाकार महत्त्वाचा मानला जातो. तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये वैनगंगा नदीच्या जलसंपत्तीचा अधिक प्रभावी वापर करून पूर्व विदर्भातील जलसमृद्धीचा मार्ग खुला करण्यावर भर देण्याबाबत जलसंपदा विभागाला सूचना दिल्या होत्या. नदीवर टप्प्याटप्प्याने बॅरेजेस उभारल्यास सिंचन क्षमता वाढेल, एकापेक्षा अधिक पिके घेणे शक्य होईल आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना मिळेल, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आता त्या संकल्पनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात आकार घेताना दिसत आहे.चिचडोह बॅरेज; ११४.८२ दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन

या योजनेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून चामोर्शी गावाजवळील चिचडोह बॅरेज पूर्ण होऊन कार्यान्वित झाला आहे. या बॅरेजमुळे वाघोली-बुटी आणि तळोधी मोकासा या उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण झाली असून वाघोली बुटी या योजनेचे लाभक्षेत्रास गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाद्वारे कालव्याद्वारे सिंचन होत आहे. त्यामुळे, चिचडोह बॅरेजच्या पाणीपसाऱ्यातून तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना कार्यरत असून प्रकल्पामुळे चामोर्शी परिसरातील १६ गावांमधील सुमारे ४३३० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. चिचडोह बॅरेजच्या पाणी पसाऱ्यातून राजीव चिचडोह योजनेला प्रशासकीय मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे दिना प्रकल्पाच्या पुच्छ भागातील १३ गावाच्या ४०१७ हेक्टर व १२३३ हेक्टर स्वतंत्र लाभक्षेत्रास सिंचनाच्या सुविधा पुरविल्या जाणार आहे. चिचडोह बॅरेजची एकूण साठवण क्षमता ६२.३५ दशलक्ष घनमीटर असून सिंचन (८१.३५), पिण्याचे पाणी (९.३८), औद्योगिक वापर (६.२५) आणि बाष्पीभवनाचा(१७.८४) विचार करून एकूण ११४.८२ दशलक्ष घनमीटर पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे.

कोटगल बॅरेजचे काम वेगाने सुरू

गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजचे काम सध्या प्रगतीपथावर असून या प्रकल्पाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या बॅरेजच्या माध्यमातून पोर्ला-वसा, कोटगल आणि गोगाव या तीन उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी कोटगल आणि गोगाव योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ४१ गावांमधील सुमारे १० हजार १९९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

कळमगाव बॅरेजचे पुनर्मूल्यांकन

चामोर्शी तालुक्यातील कळमगाव बॅरेजच्या लाभक्षेत्रातील बहुतांश योजना गोसीखुर्द प्रकल्पात समाविष्ट झाल्या आहेत. तर उर्वरित योजना चिचडोह बॅरेजमधून प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या या प्रकल्पाच्या लाभक्षेत्राचे पुनर्मूल्यांकन सुरू असून भविष्यात पिण्याच्या पाणीपुरवठा अथवा औद्योगिक गरजांच्या अनुषंगाने त्याचा पुनर्विचार करण्यात येणार आहे.

ऐनबोथला आणि डोंगरसावंगी बॅरेजेसच्या अभ्यासाला गती

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित ऐनबोथला बॅरेजमुळे बोरगाव, नांदगाव, भननारहेटी आणि रामपूर-चंदनखेडी या चार उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे ६९ गावांमधील तब्बल २४ हजार २६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे. तसेच, सदर प्रकल्पातून गडचिरोली जिल्ह्याची औद्योगिक पाणी मागणी गरज काहीश्या प्रमाणात भागवली जाणे शक्य आहे. हुमन नदी प्रकल्पापासून स्वतंत्र ठेवून या प्रकल्पाचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास सध्या सुरू आहे. तसेच, आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी बॅरेजच्या माध्यमातून डोंगरगाव-ठाणेगाव आणि देऊळगाव-डोंगरसावंगी योजनांना शाश्वत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे १७ गावांमधील ४ हजार ५४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या वैनगंगा नदीच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून विविध प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. चिचडोह बॅरेज कार्यान्वित झाल्यानंतर कोटगल, ऐनबोथला आणि डोंगरसावंगी हे प्रकल्पही पूर्णत्वास गेल्यास गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील मिळून सुमारे ५३ हजार ६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे जवळपास १९८ गावांतील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध होईल. सिंचनासोबतच पिण्याचे पाणी, औद्योगिक विकास आणि भूजल पुनर्भरणालाही चालना मिळणार असून पूर्व विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.

नुकतेच जलसंपदा विभागाच्या बैठकीत ऐनबोथला आणि डोंगरसावंगी या प्रस्तावित बॅरेजेसचे सुधारित आराखडे आणि पिकपाणी गरजेच्या अभ्यासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आकार घेत असलेल्या या जलसमृद्धी उपक्रमामुळे वैनगंगा खोऱ्यातील विकासाला नवी दिशा मिळणार असून पूर्व विदर्भाच्या परिवर्तनात हे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.