हंसराज,भंडारा :- भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सहेली दुकान आणि भारत फॅशन मॉलच्या मध्यभागी असलेल्या साजनदास कोडणामाल यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे तयार कापड जळून खाक झाले असून व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भंडारा शहरात साजनदास आणि ‘पहणावा’ ही दोन मोठी व प्रसिद्ध कापड दुकाने आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साजनदास कोडणामाल यांच्या नवीन कापड दुकानाचे लवकरच उद्घाटन होणार होते, त्याकरिता मोठ्या प्रमाणावर नवीन स्टॉक खरेदी करून ठेवण्यात आला होता. तिन्ही दुकानांसाठीचा एकत्रित माल या एकाच गोदामात साठवून ठेवला होता. मात्र, अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
आगीची भीषणता एवढी मोठी होती की, गोदामातील एकही कपडा वाचवता आला नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत गोदामातील लाखो रुपयांचा माल जळून राख झाला होता. नवीन हंगामासाठी आणि नवीन दुकानाच्या ओपनिंगसाठी आणलेला सर्वच माल नष्ट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेवटी, आगीत राख झालेले कपडे जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून ट्रॅक्टरमध्ये भरून कचराकुंडीत टाकावे लागले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.







