spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्टॉप डायरिया अभियानाला सुरुवात

हंसराज भंडारा :- देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून सुमारे ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. उन्हाळा व पावसाळ्यात बालकांमध्ये अतिसाराचे प्रमाण अधिक आढळून येते. बालमृत्यू दरात घट आणण्यासाठी व बालकांमधील अतिसाराचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्ह्यात १६ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया’ (Intensified Diarrhea Control Fortnight) विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिली.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील 74,736 बालकांना ओआरएस (ORS) व झिंकच्या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये 44,120 ओआरएस पाकिटे, 2,89,930 झिंक गोळ्या व 6,291 झिंक सिरपची उपलब्धता करण्यात आली आहे. आशा सेविकांमार्फत प्रत्येक घरात भेट देऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार औषधोपचारही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

जिल्ह्यातील 1,145 कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ही मोहीम गावपातळीवर राबविण्यात येणार आहे. मोहीम कालावधीत घरोघरी भेट देऊन बालकांची अतिसारासाठी तपासणी, जलसंजीवनी तयार करण्याचे प्रात्यक्षिक, जलसंजीवनी व झिंक गोळ्यांचे वितरण, हात धुण्याचे प्रात्यक्षिक तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.

मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्या व जिल्हा परिषद शाळांमधील बालकांचे सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच 12,07,112 लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रातील 3,01,598 कुटुंबांपर्यंत आशा सेविका व आरोग्य यंत्रणा पोहोचून आरोग्यविषयक मार्गदर्शन करणार आहेत.

बालकाला नेहमीपेक्षा अधिक वेळा पातळ शौच होत असल्यास त्याला अतिसार झाला आहे असे समजावे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्यास जलशुष्कता म्हणतात. बालक चिडचिडे किंवा अस्वस्थ होणे, भोवळ येणे किंवा बेशुद्ध होणे, अतितहान लागणे किंवा पाणी पिऊ न शकणे, डोळे खोल जाणे तसेच त्वचेची लवचिकता कमी होणे ही जलशुष्कतेची प्रमुख लक्षणे आहेत.

अतिसारामध्ये जुलाब किंवा उलट्या सुरू असल्या तरी जलशुष्कता नसल्यास जलसंजीवनी, पेज, सरबत यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा. जलशुष्कता असल्यास जलसंजीवनी व घरगुती पेयांसोबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तीव्र जलशुष्कता असल्यास रुग्णाला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करावेत. अशा स्थितीत रिंगर लॅक्टेट सलाईन हे सर्वाधिक उपयुक्त द्रावण मानले जाते.

अतिसारामध्ये झिंक गोळ्या दिल्यास अतिसाराचे प्रमाण व तीव्रता कमी होते. तसेच पुढील तीन महिन्यांपर्यंत संरक्षण मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अतिसाराचा कालावधी सुमारे २५ टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते. जलसंजीवनीचे द्रावण तयार केल्यानंतर २४ तासांच्या आत वापरावे व उरलेले द्रावण टाकून द्यावे. वयोगटानुसार झिंकची योग्य मात्रा सलग १४ दिवस द्यावी.

अतिसार टाळण्यासाठी शुद्ध पाणी पिणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, शौचानंतर साबणाने हात धुणे, मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावणे तसेच बालकांचे रोटा व गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीषा साकोडे यांनी पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यात बालकांमध्ये अतिसाराचा धोका वाढत असल्याने आशा सेविका घरी आल्यास त्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे व बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घ्यावी.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.