Home Latest News गुणांपलीकडचे शिक्षण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एडुसन फाऊंडेशनचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

गुणांपलीकडचे शिक्षण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एडुसन फाऊंडेशनचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

0
24

नागपूर :- आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पाठ्यपुस्तकांपुरते शिक्षण मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, नेतृत्वगुण आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित होणे काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून एडुसन फाऊंडेशनने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. फाऊंडेशनच्या एडुसन अकॅडमी या शैक्षणिक व्यासपीठामार्फत इयत्ता ८वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप- आधारित कौशल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, व्यवस्थापन कौशल्ये आणि उद्योजकतेचे धडे देणे हा आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, डिजिटल कौशल्ये, व्यवस्थापन, संवादकौशल्य, नेतृत्व विकास, आर्थिक साक्षरता तसेच उद्योजकता विकास यांसारख्या विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच विविध प्रकल्पांमध्ये सहभाग आणि इंटर्नशिप द्वारे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सध्याच्या काळात अनेक विद्यार्थी शिक्षण आणि करिअर निवडीबाबत संभ्रमित असतात. वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांवरही तणाव निर्माण होतो. एडुसन फाऊंडेशनचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र ओळखण्यास मदत करणार असून शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यास हातभार लावणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षांमधील गुणांवर लक्ष केंद्रित न करता जीवनासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. इंटर्नशिप- आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि भविष्यातील करिअर संधींबाबत स्पष्ट दिशा मिळेल.” विद्यार्थ्यांमध्ये योग्य वयात कौशल्य विकास आणि उद्योजकीय दृष्टिकोन रुजविल्यास ते भविष्यात रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे नागरिक बनू शकतात, असा विश्वास एडुसन फाऊंडेशनने व्यक्त केला आहे. विद्यार्थी, पालक, शाळा आणि समाज यांच्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून आधुनिक शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्राशी विद्यार्थ्यांना जोडणारा हा कार्यक्रम शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.