Home Latest News ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर – खा.अमोल...

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता ‘मराठी वारसा’ युट्यूब चॅनेलवर – खा.अमोल कोल्हे

0
20

– येत्या २० जूनपासून प्रत्येक बुधवार आणि शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका नव्या स्वरूपात

नागपूर :- निर्माते, अभिनेते तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन निर्मित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही फुले दाम्पत्यांच्या क्रांतिकारी जीवनकार्यावर आधारित ऐतिहासिक मालिका ५ जानेवारी २०२६ पासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होत होती. या मालिकेचे एकूण १५४ भाग प्रसारित झाल्यानंतर टीआरपीचे कारण देत स्टार प्रवाहने १४ जून २०२६ पासून ही मालिका अचानक बंद केली. या पार्श्वभूमीवर मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्यभरातील फुलेप्रेमींशी संवाद साधून पुढील भूमिका स्पष्ट केली. मालिका पुन्हा सुरू करण्यासाठी विविध स्तरांतून आलेल्या सूचना व पर्यायांचा सखोल अभ्यास केल्यानंतर सर्वानुमते ही मालिका ‘मराठी वारसा’ या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीपीठाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, येत्या २० जून पासून प्रत्येक बुधवार आणि शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे जागतिक कीर्तीचे समाजसुधारक व विचारवंत होते. त्यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि स्त्री-मुक्तीसाठी उभारलेल्या व्यापक चळवळीमुळे बहुजन समाजाला न्याय व स्वाभिमानाचा मार्ग मिळाला. त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा आणि सत्यशोधक विचारांचा वेध घेणारी ही मालिका नव्या माध्यमातून अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याने फुलेप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

फुले दाम्पत्यांचे ऐतिहासिक कार्य, प्रगत विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी ही मालिका पाहावी तसेच आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सावित्री शक्तिपीठ महानगर नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या आवाहनावर मार्गदर्शक प्रा.डॉ.अलका झाडे, प्रा.डॉ.संगीता बनाईत, वसुधा येणकर, देवेंद्र काटे, शंकर घोळसे, प्रभाकर तांडेकर, प्रभाकर शिंदे तसेच अध्यक्ष प्रा.डॉ.सायली सारडे, उपाध्यक्ष प्रा.देवल अढाऊ, सचिव माया जोगे, समन्वयक मनीषा काटे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी गीतमाला वसाके, मनीषा आलोने, माधुरी पाटील, शितल नेरकर, संगीता शेरजे, जयश्री लेंडे, विद्या पाचघरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.