spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच संपवलं जीवन, डॉक्टर पतीला अटक

अंबरनाथ :- अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या नवविवाहितेच्या डॉक्टर पतीला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. या घटनेनं अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.

लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास

पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शेजाऱ्यांशी बोलल्यास मारहाण करणे, तसेच माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी दबाव टाकणे, असे गंभीर आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केले आहेत. विशाखा टिळेकर असं या 26 वर्षीय मृत नवविवाहितेचं नाव होतं. अंबरनाथमधील डॉ. नितीन टिळेकर याच्यासोबत 30 एप्रिल 2026 रोजी तिचं लग्न झालं होतं. लग्नापूर्वी सगळं सुरळीत होतं, मात्र लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली. लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान मिळालं नाही, माहेरून पैसे आणि दागिने आणले नाहीत, यासाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता.

पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी रात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले

इतकंच नव्हे, तर पत्नी दिवसभर काय करते, कोणाशी बोलते आणि कुठे जाते यावर लक्ष ठेवण्यासाठी पती डॉ. नितीन टिळेकर याने घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. विशाखाला तिच्या माहेरच्यांशी बोलण्यास सुद्धा मज्जाव करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी शेजारच्या महिलेशी बोलल्याच्या कारणावरून विशाखाला पतीने मारहाण केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्यावर होत असलेल्या त्रासाबाबत आईला माहिती दिली होती. यानंतर आई-वडील तिला माहेरी घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच विशाखाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंड्यासाठी छळ करणे यासह इतर कलमांनुसार पती डॉ. नितीन टिळेकर याच्यासह सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून नितीन टिळेकर याला बेड्या ठोकल्या आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.