कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी.बी. कॉलनी परिसरातील एका नामवंत कॅफे’मध्ये घरगुती वापराचा गॅस सिलेंडर व्यावसायिक कारणासाठी वापरला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजताच्या सुमारास कॅफेवर धाड टाकली.
तपासणीदरम्यान कॅफेमध्ये काही ग्राहक उपस्थित होते. तसेच काऊंटरखाली स्टीलच्या शेगडीला लाल रंगाचे एचपी कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडर जोडलेले आढळून आले. याबाबत चौकशी केली असता संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
पोलिसांनी घटनास्थळावरून २ हजार ९०० रुपये किमतीचा घरगुती गॅस सिलेंडर आणि ५ हजार रुपये किमतीची दोन बर्नरची स्टील शेगडी असा एकूण ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सादिक खान अब्दुल रशीद (वय ४२), मो. रिजवान मो. इस्माईल (वय ४८) आणि एका १७ वर्षीय तरुणाविरुद्ध अनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत.







