नागपूर, २९ : महाराष्ट्राची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरला रविवारी रात्री गुन्हेगारांनी अक्षरशः वेठीस धरले. २४ तासांत घडलेल्या चार वेगवेगळ्या खूनी हल्ल्यांच्या घटनांनी शहर हादरले असून, त्यात दोघांना प्राण गमवावे लागले तर दोघे गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत. या रक्तरंजित रात्रीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१. जुनी मंगळवारी: दारूच्या पैशांवरून मित्रांकडूनच खून
पहिल्या धक्कादायक घटनेत, लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी मंगळवारी परिसरातील गुजरी चौकात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या वादातून हर्षल अनिल सौदागर (२४) या तरुणाचा त्याच्याच मित्रांनी चाकूने वार करून निर्घृण खून केला. रात्री ११.४० वाजता घडलेल्या या थरारनाट्यात राहूल उर्फ डड्डा शेटे, प्रज्वल उर्फ फारूख कानारकर, प्रज्वल उर्फ पज्जी सुधाकर डोरले, वैभव उर्फ कंडम हिरामण या चार सराईत गुन्हेगारांनी हर्षलला मारहाण करत चाकूने हल्ला चढवला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना शस्त्रासह अटक केली आहे. हर्षल आणि मुख्य आरोपी प्रज्वल कनारकर यांच्यात काही दिवसांपूर्वी वाहन उचलण्यावरून वाद झाला होता, तोच राग पुन्हा उफाळून आल्याचेही समोर आले आहे.
२. फुले मार्केट: क्षुल्लक वादातून मित्राचा जीव घेतला
दुसऱ्या घटनेत, गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुले मार्केटमधील पत्रावळीच्या दुकानासमोर क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात अमोल पैकूजी बनकर (३६) याचा जीव गेला. श्वेतांबर उर्फ मुलूक दुर्योधन मेश्राम (४६) याने अमोलला जोरात ढकलून दिले. यात तोल गेल्याने अमोल डोक्याच्या भारावर दगडावर आदळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी श्वेतांबर मेश्रामला अटक केली आहे. अमोल आणि सीतांबर हे दोघे हमाल असून दारू पिण्याच्या जागेत हा वाद झाल्याचे समोर आले आहे.
३. दिघोरी: प्रेमास विरोध केल्याने भावजीवर चाकू हल्ला
वाठोडा पोलीस हद्दीतील दिघोरी स्मशानघाटाजवळ तिसरी गंभीर घटना घडली. जयताळातील आशिष हरसे याचा त्याच्या मेहुणी आणि महेश काळे यांच्या प्रेमास विरोध होता. याची माहिती मिळताच संतापलेल्या महेश काळेने मित्र अनुराग ढोकला सोबत घेऊन रात्री ११ वाजता आशिषला गाठले. दोघांनी आधी आशिषला मारहाण केली आणि त्यानंतर महेश काळेने त्याच्या पोटात चाकू खुपसला. रक्तबंबाळ अवस्थेत आशिषला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आशिषने दिलेल्या बयाणावरून पोलिसांनी महेश काळे आणि अनुराग ढोकला अटक केली आहे.
४. यादवनगर: ‘दहशतवादी’ संबोधत ब्लँकेट विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
चौथ्या घटनेत, यशोधरा पोलीस हद्दीतील यादवनगर येथे ब्लँकेट विक्रेता फहिम खान ममतूर मरगक याला ओळखीतल्याच अजय चव्हाण याने ‘तुम्ही दहशतवादी आहात’ असे संबोधत डोक्यात सिमेंटच्या गट्टूने वार करून गंभीर जखमी केले. अजय हा फहिमचा नेहमीचा ग्राहक होता. एका जुन्या फ्रीजच्या विक्रीवरून झालेल्या वादामुळे अजयचे मित्र ऋषी आणि मयंक यांनी फहिमला शिवीगाळ करत मारहाण केली, आणि याचवेळी अजयने हा प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी फहिमला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकाच रात्रीत घडलेल्या या चार गंभीर घटनांनी नागपुरातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव समोर आणले आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही आरोपींना अटक केली असली, तरी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याची गरज या घटनांनी अधोरेखित केली आहे. यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.








