spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपुरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, राजस्थानात विक्री करून जबरदस्तीने लग्न; पालकांनाही मारहाण

 

नागपूर, २९ : नागपूर शहरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला राजस्थानमध्ये विकून बळजबरीने लग्न लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, २१ जुलै रोजी सज्जू नावाचा एक ओळखीचा युवक पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला राजस्थानला फिरायला जाण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. सुरुवातीला मुलीची आई आणि सज्जू सोबत होते. नंतर रोमा पाटील आणि सचिन मरघडे यांच्यासह जमनालाल, त्याची पत्नी, गोलू आणि गोलूचा मामा (सर्व राजस्थानचे) हे स्कार्पिओने त्यांना राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रेलावद येथे घेऊन गेले.

दुसऱ्या दिवशी, रेलावद येथे पोहोचल्यावर रोमा, सचिन आणि गोलूच्या मामाने अल्पवयीन मुलीचे बळजबरीने गोलूशी लग्न लावून दिले. मुलगी रडत असतानाही तिच्यावर दबाव टाकण्यात आला. सज्जूने विरोध केला असता त्याला मारहाण करून परत नागपूरला पाठवण्यात आले. सज्जूने नागपूरला परतल्यावर मुलीच्या आईला घडलेला प्रकार सांगितला.

पालकांना मारहाण, धमकी आणि स्टॅम्पपेपरवर स्वाक्षरी

२५ जुलै रोजी मुलीची आई, बहीण आणि शेजारी राहणारा एक युवक सज्जू सोबत मुलीला परत आणण्यासाठी रेलावद येथे गेले. तिथे त्यांनी मुलीला परत करण्याची मागणी केली असता, गोलूचे नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी त्यांना काठीने बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर, मुलीच्या आईला बळजबरीने एका कारमध्ये डांबून दुसऱ्या गावात नेले. तिथे तिच्याकडून एका कोऱ्या स्टॅम्पपेपरवर अडीच लाख रुपये उधार घेतल्याचे लिहून स्वाक्षरी घेण्यात आली. त्यानंतर ‘याबाबत पोलिसांना माहिती दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबातील सदस्यांना ठार मारू’ अशी धमकी देऊन त्यांना परत नागपूरला पाठवण्यात आले.

नागपुरात परत आल्यानंतर मुलीच्या आईने वाठोडा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून वाठोडा पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले आहे. मुलीची लग्नासाठी विक्री करण्यात आल्याचा संशय असून, पोलीस त्या दिशेनेही तपास करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.