spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी महानगरपालिकेचा पुढाकार

– झीरो माईल स्मारक व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम

नागपूर :- देशाच्या भौगोलिक मध्यबिंदूचे प्रतीक आणि नागपूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या झीरो माईल (शून्य मैल) स्मारक व शून्य मैल चौक परिसरात नागपूर महानगरपालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत परिसरातील वाढलेले गवत, झुडपे, सुकलेला पालापाचोळा व इतर कचरा हटविण्यात आला. तसेच परिसर अधिक स्वच्छ, सुशोभित व पर्यटकांसाठी आकर्षक करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती  शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वाखाली सदर परिसराची स्वच्छता करण्यात आली. झीरो माईल शून्य मैल परिसर हा नागपूरच्या वैभवशाली इतिहासाचा आणि शहराच्या जागतिक ओळखीचा अविभाज्य भाग असल्याने त्याच्या स्वच्छतेसह सौंदर्य जपण्यास महापालिका कटिबद्ध आहे.

महानगरपालिकेकडून आगामी काळात या परिसरात नियमित स्वच्छता, हरित संवर्धन, देखभाल आणि सौंदर्यीकरणाची कामे सातत्याने करण्यात येणार असून, शहरातील सर्व ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळे स्वच्छ व आकर्षक ठेवण्यासाठी विशेष कृती आराखडाही राबविण्यात येणार आहे.

झीरो माईल(शून्य मैल) हे केवळ नागपूरचेच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या भूगोलातील एक महत्वाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक वारशाची स्वच्छता, देखभाल आणि संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नागपूर महानगरपालिका शहरातील प्रत्येक वारसा स्थळ स्वच्छ, सुशोभित आणि नागरिक व पर्यटकांसाठी प्रेरणादायी ठेवण्यास कटिबद्ध असून, यासाठी सातत्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात येतील.”

-शिवानी दाणी वखरे सभापती, स्थायी समिती, नागपूर महानगरपालिका

Popular Articles