spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावनेरमध्ये तीन दिवसीय योग शिबिराचे उत्साहात उद्घाटन; आमदार आशिष देशमुख यांच्याकडून ‘योग भवन’ची घोषणा

सावनेर :- आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावनेर येथे पतंजली योग समिती सावनेर आणि नगर परिषद सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे भव्य उद्घाटन आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. याप्रसंगी बोलताना आमदार देशमुख यांनी सावनेरमध्ये पतंजलि योग समितीला ‘योग भवन’ बांधून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली, ज्यामुळे उपस्थित योगसाधकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

उद्घाटन भाषणात आमदार डॉ. आशिष देशमुख म्हणाले की, “योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून, तो मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल साधणारी प्राचीन भारतीय विद्या आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे समजावून सांगणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.” यासोबतच त्यांनी सर्वांना दैनंदिन जीवनात योग साधना करण्याचे आवाहन केले.

यावेळी नगराध्यक्षा संजना मंगळे, पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव,भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव मोवाडे, नगरसेवक डॉ विजय धोटे, राजू घुगल,मंदार मंगळे, निलेश पटे,आशिष मानकर, शालिक मोहतुरे, योगिता घोरमारे, प्रा.कमल भारद्वाज, माजी सभापती तुषार उमाटे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील शेकडो नागरिकांनी, महिलांनी आणि तरुणांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनीही योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

तीन दिवसीय शिबिरामध्ये पहिल्या दिवशी योगाची मूलभूत माहिती आणि साधे आसन,

दुसऱ्या दिवशी प्राणायाम आणि श्वास नियंत्रण तंत्र,तिसऱ्या दिवशी ध्यान, विश्रांती तंत्र आणि योगाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन असे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचा भव्य समारोप २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमाने होणार आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles