पुणे :- पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. माणिकबाग भागात एका २७ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. तिने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. विशेष म्हणजे संबंधित तरुणीने दोन वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केलं होतं. पण अवघ्या दोनच वर्षात तिचा संसार अर्ध्यावर मोडला.
मूल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून सतत होणारा मानसिक छळ आणि टोमण्यांना कंटाळून या उच्चशिक्षित तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दीप्ती प्रदीप एकशिंगे असं या मृत तरुणीचं नाव असून, याप्रकरणी तिच्या पतीसह सासू आणि इतर नातेवाइकांवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत दीप्ती ही मूळची गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या गावाची रहिवासी होती. उच्च शिक्षण पूर्ण करून ती पुण्यात एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत होती. याच कंपनीत काम करत असताना तिची ओळख प्रदीप विठ्ठल एकशिंगे या तरुणाशी झाली. एकत्र काम करत असताना त्यांच्यात जवळीक वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यातच प्रेमविवाह केला होता.
मानसिक छळ आणि शारीरिक छळ
विवाह होऊन काही काळ लोटल्यानंतर दीप्तीला मूल होत नव्हतं. याच कारणावरून सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास आणि तिचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. दीप्तीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांकडून तिला वारंवार टोमणे मारले जात होते. एका उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या स्वावलंबी तरुणीला केवळ ‘मूल होत नाही’ या कारणावरून सतत हीन वागणूक दिली जात होती. सासरच्या या सततच्या मानसिक त्रासाला दीप्ती पूर्णपणे कंटाळली. याच नैराश्यातून तिने माणिकबाग येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपलं आयुष्य संपवलं.
भावाकडून पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी दीप्तीचा भाऊ डॉ. किरण तुषार दूधबवळे (वय ३०) यांनी सिंहगड रोड पोलिसांत धाव घेत सविस्तर फिर्याद दिली आहे. डॉ. दूधबवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दीप्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती प्रदीप विठ्ठल एकशिंगे, सासू सुरेखा एकशिंगे आणि इतर काही नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.







