कामठी :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी कामठी शहरातील निसर्गरम्य कर्णिका नदी तटावरील महादेव घाट येथे योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम लायन्स क्लब, एकलव्य फाउंडेशन व भाजपा कामठी शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नागरिक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी उपस्थितांना योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभ समजावून सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य सुदृढ राहते तसेच तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
विशेष म्हणजे, योगासन ध्यान केंद्र ही संस्था सन 1982 पासून कार्यरत असून येथे नियमित योग वर्ग घेतले जातात. गेल्या चार दशकांहून अधिक काळ या संस्थेने योग प्रचार-प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ह्या वेळी योग शिक्षक चंद्रशेखर मेश्राम ह्यांच्या मार्गदर्शनात 3 दिवसीय योग शिबीर घेण्यात आले, योगासन ध्यान केंद्र के अध्यक्ष महेंद्र वाही, प्रकाश सुखीजा, महादेव वैद्य, मोंटू बुटानी, महेश अग्रवाल, अशोक पाटील, बिल्लू यादव, चंदू शिवरकर, नंदू चिखले, मुकुंद यादव, बबलू रोचलानी, कृष्णा चौरसिया, संजय तिवसकर, लायंस क्लब तर्फे बाबर वाही, राजा जोहर, महेंद्र वाही, एकलव्य फाउंडेशन तर्फे अध्यक्ष राजेश देशमुख, सतीश वर्मा, बाबू बैस, विवेक वाड़ीभस्में, मनीष दीपानी तसेच भाजपा तर्फे विवेक मंगतानी, मनोनीत सदस्थ्य कैंटोनमेंट कमल यादव व अनेक योगाभ्यासी उपस्थित होते
महादेव घाटाच्या पवित्र व नैसर्गिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे योग, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. उपस्थितांनी दररोज योग करण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




