– मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेने स्थानिक वैदूंना सन्मान
नागपूर :- गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने सर्वसाधारण आजारांसाठी स्थानिक वैदूंच्या सहकार्याने वैद्य चिकित्सालय सुरू केले असून, अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वात या विद्यापीठाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
स्थानिक लोकांच्या हिताच्यादृष्टीने विद्यापीठाने विविध उपक्रम राबविण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यापासून प्रेरणा घेत, पारंपरिक चिकित्सेचे ज्ञान असलेल्या या परिसरातील वैदूंची सेवा प्रमाणित व्हावी, त्यातून त्यांना काही आर्थिक लाभ व्हावा आणि गरजू रुग्णांना वैदूंच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा या उद्देशाने विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातच हे वैद्य चिकित्सालय सुरू केले आहे.
विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरकडे (एसटीआरसी) या केंद्राची जबाबदारी आहे. त्यामुळे पारंपरिक आदिवासी वैद्यकीय ज्ञान आणि आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली यांची सांगड घालण्यात आली आहे. स्वप्नील गिरडे हे एसटीआरसीचे प्रमुख आहेत. दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधव शेकडो वर्षांपासून प्राथमिक आरोग्य सेवा पुरवित आहेत, मात्र त्यांना कधी औपचारिक मान्यता मिळाली नव्हती. ते आता शक्य झाले आहे. विद्यापीठातर्फे या पारंपरिक चिकित्सकांना संस्थात्मक मान्यता व प्रमाणपत्र देण्यात येते. आदिवासी समुदायांना परवडणारी व त्यांना भावणारी आरोग्य सेवा हे वैद्य चिकित्सालय देते. त्याचप्रमाणे संशोधन आणि प्रमाणीकरणाद्वारे पारंपरिक व आधुनिक वैद्यकशास्त्रातील दरी कमी करण्याचा उत्तम प्रयत्न याद्वारे होत आहे. नक्षलग्रस्त हीच खरे तर गडचिरोलीची आजवरची ओळख, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ओळख पुसून विकासगंगा या परिसरात आणली.
या जंगलव्याप्त जिल्ह्यात गोंड, माडिया, पारधी या सारख्या आदिवासी जमाती कित्येक शतकांपासून वास्तव्यास आहेत. हे सर्व समुदाय प्राथमिक आरोग्यसेवेसाठी पारंपरिक वैद्यकीय पद्धतीवर अवलंबून असतात.
या वैदुंकडे आरोग्य सेवेचा दीर्घ अनुभव, औषधी वनस्पतींचे ज्ञान असले, तरी अवैज्ञानिक अशीच त्यांची हेटाळणी होत असते. आदिवासी भागातील तरुणही आता शहरात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे हे पारंपरिक वैद्यकीय ज्ञान नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुर्गम खेड्यांमध्ये ॲलोपथिक डॉक्टर नसतात, तिथे हेच वैदू आरोग्य सेवा पुरिवत असतात, मात्र यात संशोधन आणि दस्तवेजीकरण नसल्याने हे उपचार दुलर्क्षित राहतात. या उणिवा ओळखूनच कुलुगरु डॉ. बोकारे यांनी हे पारंपरिक ज्ञान जतन करणे आणि ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी पारंपरिक वैदूंना औपचारिक आरोग्यसेवा प्रणालीत समाविष्ट करण्याचे ठरविले व हा प्रकल्प प्रत्यक्षात आणला.
एसटीआरसीने पहिल्या टप्पयात वैदू आणि रहिवाशांचा विश्वास संपादन करण्यासाठी गावपातळीवर वैद्य संमेलने आयोजित केली. यातून ज्यांच्याकडे हे पारंपरिक ज्ञान आहे त्यांना हेरण्यात आले.
वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच निसर्गोपचार तज्ज्ञ यांच्या मदतीने या उपायांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात वैद्य चिकित्सालय सुरू करण्यात आले. आजघडीस १४ चिकित्सक येथे सेवा देतात आणि ५० हून अधिक वैदू आपल्या गावात सामाजिक मान्यता आणि अर्थार्जनासह सेवा देत आहेत. यापूर्वी अशी मान्यता त्यांना मिळत नव्हती. या बाह्य रुग्ण विभागात २० ते ५० रुपयात उपचार दिले जातात. तसेच गरजू रुग्णांना आधुनिक चिकित्सकांकडे जाण्याचा सल्ला देण्यात येतो. आजवर हजारो रुग्णांनी या वैदू चिकित्सालयाचा लाभ घेतला आाहे.
पिढ्यान पिढ्यांपासून चालत आलेली ही वैद्यक उपचाराची परंपरा, पण अवैज्ञानिकतेच्या शिक्क्यामुळे उपेक्षा, अपमान हेच या वैदूंच्या वाट्याला आले होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली असल्याचे वैद्य चिकित्सालयातील चिकित्सक रामभाई ललाई राऊत यांनी सांगितले. विद्यापीठाने त्यांच्या पारंपरिक वैद्यक ज्ञानाला सन्मान मिळवून दिला. त्यामुळे आपण वैद्य असल्याचा अभिमान ते बाळगू लागले आहेत.
सामाजिक- सांस्कृतिक पुनरुज्जीवन- कुलगुरु डॉ. बोकारे
वैद्य चिकित्सालय ही केवळ आरोग्य सेवा नसून, सामाजिक- सांस्कृतिक पुनरुज्जीवन आहे. शतकानुशतके चालत आलेल्या औषधी वनस्पतींचे दस्तवेजीकरण त्यामुळे शक्य झाले. वैद्यक शाखेतील पारंपरिक आणि आधुनिक ज्ञान यांची सांगड यानिमित्ताने घालण्यात आली. काळाच्या ओघात हे ज्ञान नष्ट झाले असते मात्र त्याचे जतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने सुरू झाले आहे. उपेक्षित पारंपरिक चिकित्सकांची परवडणारी प्राथमिक आरोग्य सेवा या चिकित्सालयाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले.




