नागपूर :- आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज, नागपूरच्या वतीने भव्य लक्षवेधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 10 वाजता यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत हे आंदोलन पार पडणार आहे. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मोर्चा समितीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यशवंत स्टेडियम येथून आंदोलनाला सुरुवात होणार असून संविधान चौक येथे आंदोलनाचा समारोप होईल. आरक्षणाचा लाभ समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत न्याय्य पद्धतीने पोहोचावा, तसेच समान हक्क आणि समान संधी मिळाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सकल मातंग समाजासह चर्मकार, खाटीक,बुरड,वाल्मिकी,मांग गारुडी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “हक्क आमचा, निर्णय आमचा” आणि “न्याय, हक्क व स्वाभिमान” या घोषणांसह आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या आंदोलनात समाजातील विविध संघटना, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मोर्चा समिती नागपूर च्यावतीने केले आहे. आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एकजूट दाखवून शासनापर्यंत आपली भूमिका ठामपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कृती समितीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी कळविले आहे.








