spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कल्पतरू कॉलोनीतील बंद घरावर चोरट्याचा डल्ला; ९७ हजारांचा ऐवज लंपास

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्पतरू कॉलोनीमध्ये भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जितेंद्र ओझा (वय ४३) हे २२ जून रोजी कामानिमित्त सांची येथे गेले होते. त्यांच्या पत्नी माहेरी, तर आई नागपूर येथे मुलीकडे गेल्याने घर कुलूपबंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने घराच्या मुख्य दरवाज्याचा कोंडा तोडून आत प्रवेश केला.

दरम्यान, २६ जून रोजी फिर्यादी यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्थिती मोबाईलवर तपासली असता त्याची दिशा बदललेली दिसून आली. संशय आल्याने ते तातडीने घरी पोहोचले. त्यावेळी घराचे कुलूप तुटलेले दिसले. घराची पाहणी केली असता ५१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, ३८ हजार रुपये रोख रक्कम आणि ८४ अमेरिकन डॉलर (सुमारे ८ हजार रुपये) असा एकूण ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे उघड झाले.

या प्रकरणी जितेंद्र ओझा यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर धागेदोरे तपासून आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत.

Popular Articles