spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नसरापूर घटना प्रकरणी आरोपीला तिहेरी फाशी; वेगवान न्यायदानाचा नवा बेंचमार्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात ५९ दिवसांत न्यायप्रक्रिया पूर्ण करत न्यायालयाने आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावून वेगवान न्यायदान देऊन नवीन बेंचमार्क तयार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायप्रक्रियेतील संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देऊन या प्रकरणात १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी, तपासणी आणि उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. २५ जून २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आणि २९ जून २०२६ रोजी तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली. घटना घडल्यानंतर अवघ्या ५९ दिवसांत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षा झाल्याने हा न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणात न्यायमूर्ती एस. आर. साळुंखे यांनी सातत्यपूर्ण सुनावणी घेत वेगवान न्यायदानासाठी पुढाकार घेतला. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळेत न्याय मिळणे अत्यंत आवश्यक असून न्यायालयाने या प्रकरणातून नवा बेंचमार्क निर्माण केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या न्यायदानाबाबत माहिती देताना सांगितले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत सक्षमपणे पुरावे गोळा करून न्यायालयासमोर मांडले. पोलिसांनी गोळा केलेल्या ठोस पुराव्यांमुळे फाशी शिक्षा देणे शक्य झाले. विशेष सरकारी वकील यांनीही प्रभावीपणे बाजू मांडून खटल्याची यशस्वी हाताळणी केली असे सांगत त्यांनी पोलीस दलासह सर्वांचे अभिनंदन केले.

समाजात अशा घटना घडू नयेत, ही सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र, अशा अमानुष गुन्ह्यांमध्ये पोलीस, सरकारी पक्ष आणि न्यायालय यांनी समन्वयाने काम केल्यास अत्यल्प कालावधीत कठोर शिक्षा मिळू शकते, हे या प्रकरणातून सिद्ध झाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पीडित मुलीच्या पालकांचे दुःख कोणत्याही शिक्षेने भरून निघणार नसले, तरी न्यायालयाने आरोपीला सुनावलेली तिहेरी फाशीची शिक्षा त्यांना न्याय मिळाल्याची भावना देणारी ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Popular Articles