spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन 

– नेतृत्वगुण शिकायचे असतील तर अटलजींचे जीवन अभ्यासावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई :- अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रेरित होऊन आपण राजकारणात आलो. भावी पिढ्यांना नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता व नीतिमत्ता शिकायची असेल तर त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे सार्वजनिक जीवन अभ्यासावे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

वाजपेयी यांच्या राजकारण तसेच सार्वजनिक जीवनासंबंधी आठवणींचे संकलन असलेल्या ‘अटल संस्मरण’ या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या मुख्य उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार म्हणून कार्य केलेल्या अशोक टंडन यांनी हे पुस्तक लिहिले असून वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ते प्रकाशित करण्यात आले आहे.

नेता कसा असावा, विरोधी पक्षनेता कसा असावा याचे अटलजी मूर्तिमंत उदाहरण होते असे सांगून अटल बिहारी वाजपेयी उत्कृष्ट वक्ते होते व थोर विचारवंत होते असे राज्यपालांनी सांगितले.

उत्तरपूर्वेकडील राज्यात कठीण परिस्थितीत पक्षाचे काम करीत असताना अटलजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देत. भेटीस गेल्यास उत्तरपूर्वेकडील नेत्यांना अगोदर भेटत. विरोधी पक्षात असताना अटलजी जसे होते तसेच ते पंतप्रधान झाल्यावर देखील होते असे राज्यपालांनी सांगितले. तेरा दिवसांचे सरकार संकटात असताना देखील त्यांनी वैचारिक बांधिलकी सोडली नाही.

संसदेचे अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी अटलजींना एकदा ‘आपण नेहमी म्हणता त्या ‘भारतीयतेची’ व्याख्या काय आहे असे विचारले होते. त्यावर अटलजींनी ‘आपण बंगाल मधील असून देखील आपले नाम ‘सोमनाथ’ हे पश्चिमेकडील आहे, हीच भारतीयता आहे’, असे सांगितल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

आज सर्वत्र नैतिकतेचा ऱ्हास होत असल्याचे नमूद करून कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा अणुऊर्जा असो, वापर करणाऱ्याकडे नीतिमत्ता व मूल्ये असली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. आजकाल लोकांना कमी वेळात नेता व्हायचे असते. अटलजींनी राजकारणात कधीही ‘शॉर्टकट’ स्वीकारला नाही, असे राज्यपालांनी सांगितले.

‘अटल संस्मरण प्रेरणादायी, अंतर्मुख करणारे’: सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ‘अटल संस्मरण’ हा उच्च साहित्यिक मूल्य असलेला अटलजींच्या जीवनावरील महत्वपूर्ण दस्तावेज असल्याचे सांगितले. लेखक अशोक टंडन यांनी अनेक वर्षे अटलजींसोबत काम केले असल्यामुळे त्यांचे पुस्तक वस्तुनिष्ठ, प्रेरणादायी व अंतर्मुख करणारे झाले आहे असे शेलार यांनी सांगितले.

अटलजींचे जीवन संघर्षमय होते. ते अमोघ वक्ते व सुसंस्कृत राजकारणी होते. लोकशाही हे संवादाचे माध्यम आहे हे त्यांनी दाखवून दिले. सहमतीने राजकारण हीच त्यांची शिकवण आहे असे मंत्री शेलार यांनी सांगितले.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अटलजींचे राजकीय जीवन गेले. परंतु त्यांच्या आचार विचारात कोठेही कटुता नव्हती. कवी हृदय व मेणासारखे मऊ असणारे अटलजी प्रसंगी वज्रासारखे कठीण होत. अटलजींनी देशाला अणुऊर्जा संपन्न केल्यावर अनेक देशांनी भारतावर निर्बंध लादले तरी देखील ते डगमगले नाही, असे त्यांनी सांगितले.

आपण अटलजींसोबत सहा वर्षे काम केले व पंतप्रधान पदावरून निवृत्त झाल्यावर देखील त्यांच्या संपर्कात होतो असे सांगून लेखक अशोक टंडन यांनी अटलजींचे १३ दिवसांचे सरकार कसे बनले तसेच कम्युनिस्टांनी त्याकाळात कसे राजकारण यासंबंधी किस्से सांगितले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे पुस्तक काढले असून ती वाजपेयी यांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला गायक अनुप जलोटा, रवींद्र संघवी, बिनॉय बी. यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.