– भांडेवाडीत जाणारा ५०० टन कापडी कचरा रोखणार; ‘नवी मुंबई’ पॅटर्नवर मनपा घेणार निर्णय
नागपूर :- नागपूर शहरातील जुने, फाटलेले आणि न वापरण्याजोगे कपडे आता कचऱ्यात किंवा नाल्यात वाहून न जाता त्यांचा पुनर्वापर केला जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेने चक्रीय अर्थव्यवस्थेला (Circular Economy) चालना देण्यासाठी आणि भांडेवाडी डम्पिंग यार्डवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी शहरात ‘टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी’ (TRF) प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन करणार आहे.
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी या संदर्भात एका उच्चस्तरीय आभासी (व्हर्च्युअल) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा देसाई, मनपा अतिरिक्त आयुक्त अंकित, मुरुगानंथम एम., मिलिंद मेश्राम, उपायुक्त राजेश भगत, डॉ. रंजना लाडे आणि घनकचरा व्यवस्थापक डॉ. गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर शहरात नागरिक मोठ्या प्रमाणावर जुने व फाटलेले कपडे कचऱ्यात किंवा नाल्यांमध्ये फेकून देतात. परिणामी, भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये दररोज टनवारीने कपडे गोळा होतात. या समस्येवर तोडगा म्हणून शहरातील महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून नागरिकांकडून हा अनावश्यक कापडी कचरा गोळा केला जाईल आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल. कापडी कचरा उघड्यावर न टाकण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
नागरिकांनी आपल्या जुने, अनुपयोगी कापड कुठे ही टाकू नये, त्याला संभाळून ठेवावे आणि ही योजना अमलात आल्यानंतर मनपाच्या चमूला कापड द्या. सर्व मिळून नागपूरला स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरीता प्रयत्न करा. असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
नागपूर शहरातून दररोज सुमारे ५०० टन कपड्यांचा कचरा निघतो. या प्रकल्पासाठी शहरात ८ ते १० एकर जागेची आवश्यकता भासणार आहे. गोळा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी ७० टक्के कापड हे पुन्हा वापरण्यायोग्य (Recycle) केले जाईल, तर उर्वरित ३० टक्के कपड्यांपासून नवनवीन उत्पादने (Upcycle) तयार केली जातील. सध्या अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेत यशस्वीपणे सुरू आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामकाजाची, तंत्रज्ञानाची आणि व्यवस्थापनाची पाहणी करण्यासाठी नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांची एक विशेष टीम पुढच्या आठवड्यात नवी मुंबईला भेट देणार आहे.
“हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील नाल्यांमध्ये कापड येणे पूर्णपणे बंद होईल. या प्रकल्पामुळे शहरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून, घनकचरा व्यवस्थापनाचे नवीन नियमही कडकपणे अमलात आणले जाणार असल्याचे आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.




