– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई :- प्रभू रामचंद्रांचे आणि रामसेतूचे अस्तित्व नाकारत मंथराला लाजवेल अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसचाच पुळका जनाब संजय राऊतांना आला आहे. ‘मंदिर वही बनायेंगे, तारीख नहीं बतायेंगे’ असे म्हणत राऊतांनी एकेकाळी या आंदोलनाची खिल्ली उडवली होती. प्रभू रामचंद्रांच्या भक्तांमुळे राम मंदिर पुन्हा एकदा उभे राहिले आहे. मंदिरासंदर्भात झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. राऊत हे आता बाबराला आणि औरंगजेबाला शरण गेल्याने त्यांना प्रभू रामचंद्रांपेक्षा रावण अधिक प्रिय वाटू लागला आहे. त्यामुळे या देशातील रामभक्त तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी प्रहार केला.
विकासकामांचा निधी आणि पक्षपाताबद्दल संजय राऊत यांनी न बोललेलेच बरे. कारण महाविकास आघाडी सरकार असताना भाजपाच्या १०५ आमदारांना मविआ सरकारने फुटकी कवडीही, दमडीही दिली नव्हती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रोज शंभर कोटी रुपये वसूल करायचे, पण एकाही भाजपा आमदाराला महाराष्ट्राच्या तिजोरीतील एक रुपयाही दिला नाही. तुमच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास पूर्णपणे ठप्प झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या याच कारभारामुळे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना घरी बसवले आहे, असे बन यांनी सुनावले.
नसरापूर बलात्कार प्रकरणातील दोषीला शिक्षा झाल्यानंतर संजय राऊत यांचा तिळपापड झाला असल्याचे सांगून श्री. बन म्हणाले, महिला सुरक्षेबद्दल, बलात्काराच्या घटनांबद्दल किंवा महिलांच्या अधिकारांबद्दल त्यांनी गळा काढू नये. कारण एका माता भगिनींला त्यांनी फोनवरून दिलेल्या शिव्या संपूर्ण महाराष्ट्राने ऐकल्या आहेत. स्वप्ना पाटकर नावाच्या भगिनीला त्यांचे पुस्तक प्रकाशित होऊ नये म्हणून गुंडांकरवी धमक्या दिल्या जात आहेत. महिला सुरक्षेबद्दल बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही.
खासदारांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार राऊतांनी कधीच गमावला आहे. एकनाथजी शिंदे आणि इतर ४० आमदारांच्या जीवावर राऊत हे राज्यसभेचे खासदार झाले. फक्त अर्ध्या मताने राऊत निवडून आले. त्यामुळे आधी स्वत: राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या आणि मग इतरांच्या राजीनाम्याची मागणी करा. इतरांकडे राजीनाम्याची मागणी करण्याचा तुम्हाला कोणताही नैतिक अधिकार नाही. जनतेने उबाठा गटाला नाकारले आहे. जनतेच्या न्यायालयात एकनाथजी शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे, यावर महाराष्ट्राने शिक्कामोर्तब केले असल्याने विनाकारण रुदाली करत बसू नका, असे बन यांनी फटकारले.
महाराष्ट्राशी द्रोह करण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. घटनेनुसार चालणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी १४ कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यांनी कधीही प्रभू रामचंद्रांच्या हिंदुत्ववादाशी द्रोह करून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे काम केले नाही. उगाच देवाभाऊंना देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. देवेंद्रजी फडणवीस हे ‘राष्ट्र प्रथम’ या धोरणातून काम करतात तर तुमचा महाराष्ट्रद्रोह जनतेच्या लक्षात आलेला आहे ध्यानात ठेवा, असे बन यांनी सुनावले.




