– दोषी कन्हान पोलीस अधिकारी व ट्रक मालक-चालकांवर कारवाईची मागणी
कन्हान :- पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या डुमरी उडाण पुलावरील अपघातात दोन मित्राच्या मुत्यु प्रक रणात कन्हान पोलिसांनी जाणुनबुजुन त्रुटीपुर्ण एफ आयआर दाखल करून ट्रक मालक व चालकाला कायदेशीर कारवाई पासुन वाचविल्याचा गंभीर आरोप कांद्री भाजप नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती ॲड. रोशनी अतुल गजभिये यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी नागपुर पोलीस अधिक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित ट्रक मालक, चालक, कन्हान पोलीस अधिकारी तसेच वाहतुक पोलीस यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या १०३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार शुक्रवार (दि.२६़) जून २०२६ रोजी कन्हान परिसरातील डुमरी उडाण पुलावर उभ्या असलेल्या युपी ५३ इटी ९४०५ क्रमांकाच्या ट्रकला दुचाकीची धडक बसुन ओमप्रकाश यशवंत बावणे व रोहित सोयाम या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या प्रकरणात ट्रक मालक व चालकाची संपुर्ण माहिती, परवाना, फिटनेस, विमा तसेच कोळसा वाहतुकी संबंधी आवश्यक कागदपत्रे जप्त न करता केवळ ट्रक क्रमांकाचा उल्लेख करून अप क्र ४२३/२०२६ (दि. २६) जुन ला एफआयआर दाखल करून ट्रक मालक व ट्रक चालक आरोपींना वैध शिक्षेपासुन आरोपींना वाचविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की, संबंधित पोलिसांनी निष्काळजीपणा करत आरोपींना मदत केली असुन त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. या संपुर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, मृतक मुलाच्या कुंटुबाला योग्य न्याय मिळवुन द्यावा, अन्यथा न्यायासा ठी उपोषणाचा इशारा ॲड. रोशनी गजभिये यांनी दिला आहे.




