– महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणीची मागणी
नागपूर :- अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ मातंग आणि तत्सम ५७ वंचित जातींना मिळावा यासाठी अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ लहुजी शक्तीसेनेसह विविध मातंग समाजातील संघटनांनी महामोर्चाचे आयोजन केले होते. यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या या मोर्चाचा समारोप संविधान चौकात झाला.
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करताना जातीचा सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा आणि राज्य सेवेतील अल्प व अपुरे प्रतिनिधित्व हा निकष महत्त्वाचा मानलेला आहे. याच निकषाप्रमाणे उपवर्गीकरण लागू करण्यात यावे. हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यांनी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही या राज्यांच्या धर्तीवर उपवर्गीकरण लागू करावे, अशी मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात लहुजी शक्तीसेनेचे रमेश पाडण, अंकुश बावणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टचे लहानुजी इंगळे, महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीचे बुधाजी सुरकर, अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमीचे चंद्रकांत वानखेडे, अरविंद डोंगरे, विनायक इंगोले, कळमेश्वर तालुका मातंग समाज समितीचे राहुल हिवराळे, चर्मकार सेवा संघाचे भैय्यासाहेब बिघाणे, मांग गारोडी समाज कल्याण समितीचे रामसिंग लोंढे, हिंदू मातंग प्रतिष्ठानचे महेंद्र प्रधान, संजय सोनटक्के, अ.भा. सफाई मजदूर युनियनचे जयसिंग कछवाह, प्रवीण डोंगरे आणि नानाजी प्रधान, सागर जाधव, महेश खोडके, बंटी इंगळे, रवींद्र खडसे, राजेश डोंगरे सह आदी समाज बांधव या आंदोलनात उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य केले असून राज्य शासनाने वंचित समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी अपेक्षा मोर्चा समितीने व्यक्त केली आहे.




