– भाजपा पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण विधानसभा क्षेत्रांचा संयुक्त उपक्रम; 5 ते 15 जुलैदरम्यान स्क्रीनिंग कॅम्प; हजारो नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ
नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज आणि जाहिरातींवर खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रांच्या वतीने ‘महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी ५ ते १५ जुलैदरम्यान वॉर्डनिहाय 75 स्क्रीनिंग कॅम्प होतील. त्यातून शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती शिबिराचे संयोजक माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचे आवाहन करतात. त्याच भावनेतून गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन, तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात विविध नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर, शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय तज्ज्ञांची उपस्थिती राहणार आहे. विविध आजारांचे निदान, उपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विविध आजारांची मोफत तपासणी
या शिबिरामध्ये नेत्ररोग, अस्थिरोग, जनरल सर्जरी, हृदयरोग, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान-नाक-घसा विकार, स्त्रीरोग, जनरल मेडिसीन, त्वचा व गुप्तरोग, मनोविकार, श्वसनविकार व क्षयरोग, कर्करोग, मधुमेह, थायरॉईड तसेच दंतरोग अशा विविध आजारांची तज्ज्ञांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे.
आवश्यक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
तपासणीनंतर आवश्यक ठरणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील. तसेच सर्व आजारांवरील शस्त्रक्रियाही विनामूल्य करून देण्यात येणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अत्याधुनिक निदान चाचण्यांचीही सुविधा
महाआरोग्य शिबिरात एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, एन्जिओग्राफी, ईएमजी, ईसीजी, २-डी ईको, मॅमोग्राफी (स्तनाच्या गाठीची तपासणी), बीएमडी (हाडांच्या ठिसुळपणाची तपासणी) तसेच पीएफटी (श्वसन कार्यक्षमता तपासणी) अशा अत्याधुनिक निदान चाचण्याही मोफत करण्यात येणार आहेत.
५ ते १५ जुलैदरम्यान वॉर्डनिहाय स्क्रीनिंग कॅम्प
२६ जुलैच्या मुख्य महाआरोग्य शिबिरापूर्वी ५ ते १५ जुलै या कालावधीत पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रांतील विविध वॉर्डांमध्ये प्राथमिक आरोग्य शिबिरांचे अर्थात स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये प्राथमिक तपासणी करून आवश्यक रुग्णांची नोंदणी करण्यात येईल. गरजेनुसार त्यांना २६ जुलैच्या मुख्य शिबिरात पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाईल.
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या समाजोपयोगी उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच परिसरातील गरजू रुग्णांनाही या शिबिरात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन संयोजक संदीप जोशी यांनी केले.
सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कान्हेरे आणि रितेश पांडे यांनीही नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले.
पत्रकार परिषदेला सुनील मित्रा, महेंद्र भूगांवकर, विनय दाणी, विनोद बघेल, दिलीप दिवे, ईश्वर ढेंगळे, विनोद शिंदे, अमर खोडे, संजय ठाकरे, प्रकाश यादव, नितीन महाजन, विनय कडू यांच्यासह पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रांतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




