spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवित्र दीक्षाभूमीवर ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त परित्राण पाठ व धम्मदेसना 

– नवनिर्वाचित अध्यक्ष विलास गजघाटे यांचा सत्कार

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास गजघाटे तसेच त्यांच्या सहचारिणी सुनंदा गजघाटे यांचा बौद्ध उपासक- उपासिका संघाच्या वतीने ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने पवित्र दीक्षाभूमी येथे सोमवारी (दि. २९ जून) पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा देत दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या. याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त दीक्षाभूमीवर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भगवान बुद्ध, धम्म आणि संघ यांना वंदन करून त्रिशरण व पंचशील ग्रहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पूजनीय भिक्खू संघाच्या सान्निध्यात बुद्धपूजा, मंगल परित्राण पाठ आणि धम्मदेसना संपन्न झाली.

कार्यक्रमाला दीक्षाभूमी वरील निवासी बौद्ध भिक्खू प्रा. भिक्खू विनय आणि डॉ. भिक्खू सम्यकबोधी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खू संघाने पारंपरिक पद्धतीने सस्वर परित्राण पठण केले. या मंगलमय वातावरणात उपस्थित उपासक-उपासिकांनी अत्यंत श्रद्धाभावाने धम्मवंदना केली.धम्मदेसनेत भगवान बुद्धांनी दिलेल्या करुणा, प्रज्ञा, मैत्री, समता आणि सदाचाराच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पंचशीलाचे पालन, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि मानवतावादी मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. बुद्धांचा धम्म हा समाजात शांतता, बंधुता आणि समतेचा संदेश देणारा जीवनमार्ग असल्याचेही प्रतिपादन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विलास गजघाटे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दीक्षाभूमीचे पावित्र्य, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक- सांस्कृतिक महत्त्व जपत सर्व घटकांना विश्वासात घेऊन कार्य करण्याची ग्वाही दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी दीक्षाभूमी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला इंदिरा डोंगरे, लता डांगे, सुषमा शेंडे, मंगला खोब्रागडे, प्रतिभा मदामे, ज्योसना सूर्यवंशी, मंदा गायकवाड, अशोक शेंदरे, शरद मेश्राम, सुनील भोसले, मिलिंद थूल, विठ्ठल ढेंगरे यांच्यासह बौद्ध उपासक- उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.