हंसराज भंडारा :- जिल्हाभरात सोमवारी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचे औक्षण, ओवाळणी, पुष्पवृष्टी तसेच टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित उपस्थिती व अभ्यासाचे महत्त्व सांगितले.
शहरातील नूतन कन्या शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. नवीन मुलींची शाळा संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट एम एल भुरे, सचिव शेखर बोरसे, प्राचार्य नीलू तिडके, उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर, पर्यवेक्षक प्रिया ब्राह्मणकर यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.




