spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निकृष्ट सिमेंट रस्त्यांच्या खड्डयामुळे अपघाताला निमंत्रण

◼️ग्राम पंचायत शीतलवाडी (परसोडा) यांच्या भोंगळ कारभार 

◼️रात्रीचा वेळी खड्डे दिसत नसल्याने होतात अपघात 

सचिन चौरसीया,रामटेक :- तालुक्यातील शितलवाडी (परसोडा) ग्रामपंचायत अंतर्गत येथील लाखो रुपये खर्च करून गावागावांमध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. परंतु, रस्ते दिसण्यास जरी सुंदर असले तरी ते योग्य नियोजनाअभावी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे हे रस्ते लोकांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. वनवे हॉस्पिटल-किट्स कॉलेज मार्गावरील लक्ष किराणा दुकान सामोरील ते मनसर रोड या दरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत जीवघेणा व धोकादायक बनला असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहे. काही ठिकाणी रस्त्याल्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने ते दिसतही नाहीत. त्यामुळे वाहन खड्ड्यात जाऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला खोल खड्डे निर्माण झाल्यामुळे या मार्गावरून रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र रस्त्याची बिकट अवस्था लक्षात घेता प्रत्येक प्रवास धोकादायक ठरत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्ड्यामुळे तोल जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने अपघातांची शक्यता अधिकच वाढली आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा मधोमध मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनांना विशेषतः दुचाकीस्वरांना मार्ग काढणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत आहे. दरम्यान, नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी करत आहे.

टक्केवारीच्या गणिताची जुडवाजुडवी

पावसाचे अतिप्रमाण आणि वाढती वाहतूक लक्षात घेऊन शितलवाडी (परसोडा) ग्रामपंचायतनी रस्त्यांची बांधणी केली पाहिजे, याकडे अनेकदा प्रसारमाध्यमांसह जाणकारांनी लक्ष वेधले आहे. परंतु टक्केवारीचे गणित जुळविण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. रस्त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य बर्‍याचदा सुमार दर्जाचे असते. त्यामुळे एरव्ही गुळगुळीत किंवा चकाचक असणारे रस्ते पावसाची संततधार लागली की लगेचच खड्डेमय होऊन जातात. अंतर्गत रस्ते तर इतके खराब आहेत की या रस्त्यांचे काम करणारे कंत्राटदार, अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे लोकांना यांना कुणीतरी न्यायालयात खेचले पाहिजे.

Popular Articles