नागपूर :- महाराष्ट्राच्या कृषी विकासाला नवी दिशा देणारे, हरित क्रांतीचे शिल्पकार, शेतकरीहिताचे पुरस्कर्ते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेत अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक मा. प्रशांत वावगे यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यवस्थापकीय संचालक मा. प्रशांत वावगे यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, कृषी क्षेत्रातील परिवर्तनवादी धोरणांचा आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेतला. शेती, सिंचन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली, असेही मा. प्रशांत वावगे सांगितले. स्व. वसंतराव नाईक यांनी विकासाभिमुख, लोककल्याणकारी आणि दूरदर्शी नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजहित आणि गुणवत्तापूर्ण प्रशासनासाठी प्रत्येकाने समर्पित भावनेने कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहनही प्रशांत वावगे यांनी यावेळी केले. कार्यक्रमात उपस्थित प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याची माहिती जाणून घेत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण विकास, शिक्षण, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक प्रगतीला मिळालेल्या चालनेचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला प्रकल्प व्यवस्थापक डॉ. चेतन बन्सोड यांच्यासह ‘वनार्टी’चे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








